
गिरगाव मेट्रो-3 प्रकल्पग्रस्तांना भेडसावणाऱया प्रश्नांसंदर्भात शिवसेनेच्या वतीने नुकतीच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) संचालिकांची भेट घेण्यात आली. यावेळी प्रकल्पबाधितांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.
गिरगाव मेट्रो-3च्या प्रकल्पग्रस्त रहिवाशांच्या समस्यांबाबत शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी एमएमआरसीच्या संचालिका अश्विनी भिडे यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पुनर्विकास व पुनर्वसनाबाबत चर्चा झाली. मूळ करारनाम्याची अंमलबजावणी कधी होणार, प्रशासन व पालिकेने मंजूर केलेले मूळ रजिस्टर इमारतीचा आराखडा प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध करून द्यावा, पुनर्वसनानंतर नवीन घर कधी आणि केव्हा प्रदान करण्यात येईल, नव्या इमारतीच्या देखभालसाठी कॉर्पस फंडाची तरतूद करावी, उत्तराधिकार प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत शिथिलता द्यावी तसेच मृत प्रकल्पबाधितांच्या वारसांना आवश्यक कागदपत्राची पूर्तता करण्यास मदत करावी, मेट्रो-3 प्रकल्पातील प्रकल्पबाधित स्थानिक रहिवाशांच्या मुलांना नोकरीत व स्टॉल वाटपात प्राधान्य द्यावे, या सर्व विषयांवर चर्चा करून सर्व प्रश्न सोडण्याचे आश्वासन देण्यात आले. या बैठकीला विभागप्रमुख संतोष शिंदे, शाखाप्रमुख बाळा अहिरेकर, समन्वयक विनोद लोटलीकर उपस्थित होते.
n शिवसेनेच्या मागणीनुसार, काळबादेवी के-3 प्रकल्पामधील रहिवाशांची लॉटरी पुढील दोन दिवसांत काढण्यात येईल. या रहिवाशांना घराचा ताबा पुढच्या दिवाळीपर्यंत देण्यात येईल. तसेच गिरगाव येथील जी-3 प्रकल्पबाधित रहिवाशांची लॉटरी पुढील एक महिन्याच्या आत काढण्यात येईल आणि त्यांना 2027 मध्ये घरांचा ताबा देण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.