मिंध्यांच्या प्रिय कंत्राटदार कंपनीने मुंबई तुंबवून दाखवलीच, शिवसेनेची जोरदार टीका

बुधवारी मुंबईत काही तास पडलेल्या मुसळधार पावसामुळेम मुंबईतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती, रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक रस्ते वाहतूक कोलमडली होती. काही तासांच्या पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान अंधेरी येथे पावसाच्या पाण्यातून चालताना एका 45 वर्षीय महिलेचा देखील मृत्यू झाला होता. मुंबईची जी तुंबई झाली होती त्यावरून सध्या विरोधकांकडून मिंधे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने देखील मुंबईच्या झालेल्या या अवस्थेवरून मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे. ”मिंधे भाजप सरकारने मुंबई महानगरपालिकेची तिजोरी मुंबई तुंबवण्यासाठी रिकामी केली का? असा खरमरीत सवाल ट्विटरवरील पोस्टमधून केला आहे.

पावसाळ्यापूर्वी विकासकामांच्या बाता मारणाऱ्या मिंधे सरकारच्या कंत्राटदार मिंत्रांनी मुंबई तुंबवून दाखवल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तसेच महापालिकेचा पैसा नेमका कुठे खर्च केला असा सवाल देखील शिवसेनेने शेअर केलेल्या पोस्टमधून करण्यात आला आहे.

”पावसाळ्यापूर्वी विकासकामं केल्याच्या बड्या बड्या बाता मारल्या, पण पुन्हा मिंधे आणि त्यांच्या प्रिय कंत्राटदार कंपनीने मुंबई तुंबवून दाखवलीच. पण प्रश्न हा पडतो, की पावसाळ्यात मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरे का जावं लागतंय? नेमका महापालिकेचा पैसा खर्च झाला कुठे?”, असे ट्विट शिवसेनेने केले आहे.