
धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि मोबाईलच्या अतिरेकामुळे मुलं व मोठय़ांवर मानसिक व शारीरिक परिणाम होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता’ अर्थात ‘शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने यंदा सजावटीत लेफ्ट ब्रेन थेरपी या महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाश टाकला आहे.
लेफ्ट ब्रेन थेरपी ही थेरपी विचारशक्ती, भाषा, अनुशासन, क्रमबद्धता आणि सर्जनशीलता वाढवते. सजावटीतून विविध रंगसंगती, आकार, शब्दकोडी, पझल्स व दृश्यात्मक क्रियाकलापांद्वारे मेंदूच्या डाव्या भागाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला यंदा 51 वर्षे पूर्ण होत आहेत. ‘व्हा क्रिएटिव्ह, व्हा ऑक्टिव्ह’ ही मंडळाच्या डेकोरेशनची थीम आहे. रक्तदान, डोळ्यांची तपासणी, महिला सक्षमीकरण, शिक्षणविषयक उपक्रम, आरोग्य आणि समाजोपयोगी कार्यक्रम हे नियमितपणे राबवले जातात. तसेच प्रत्येक वर्षी मुलांना शालेय साहित्य वाटप व गणेशोत्सवाच्या 11 दिवसांत टाटा व केईएम हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी मोफत न्याहारीचे वितरण केले जाते.