
एका डॉक्टरला अटक करताना आवश्यक प्रक्रिया न केल्याने वरळीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच गोवंडीच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बापूसाहेब देशमुख यांना एका ट्रस्टच्या सचिवाकडून 1 लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
निवृत्ती अवघ्या 15 दिवसांवर आली असताना बापूसाहेब देशमुख यांना पैशांची लालसा भोवली. बापूसाहेब देशमुख (57) असे त्या वरिष्ठ निरीक्षकाचे नाव आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना देशमुख एक लाख घेताना ट्रॅप झाल्याने पोलीस दलातून संताप व्यक्त होत आहे. एका ट्रस्टच्या सचिवाने केलेल्या तक्रारीच्या आधारे देशमुखांवर ही कारवाई करण्यात आली. ऑगस्ट 2024 मध्ये काही व्यक्तींनी ट्रस्टच्या शाळेच्या गेटचे कुलूप तोडून कार्यालयात घुसखोरी केली व संस्थेवर बेकायदेशीर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. याविरोधात ट्रस्टच्या सचिवाने वरळी येथील धर्मादाय आयुक्त आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
गेल्या महिन्याच्या 22 तारखेला या तक्रारीच्या अनुषंगाने सचिवाने बापूसाहेब देशमुख यांची भेट घेतली होती. त्यावेळी धर्मादाय आयुक्तांचा अंतिम निकाल येईपर्यंत विरोधकांना शाळेत प्रवेश न देण्यासाठी तसेच विरोधकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी देशमुख यांनी पाच लाखांची मागणी केली. त्यानंतर पाचऐवजी तीन लाख देण्यास देशमुख यांनी सांगितले. परंतु लाच द्यायची नसल्याने ट्रस्टच्या सचिवाने अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. अखेर एक लाख रुपये लाचेचा पहिला हप्ता ट्रस्टच्या सचिवाकडून घेताना वरिष्ठ निरीक्षक बापूसाहेब देशमुख यांना रंगेहाथ पकडण्यात आले.