युवा खेळाडूंना शिवम दुबेचा आधार

आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चेन्नईच्या डावाला आधार देणाऱ्या शिवम दुबेने तामीळनाडूच्या युवा खेळाडूंना आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. तामीळनाडू क्रीडा पत्रकार संघटनेच्या (टीएनसीए) शिष्यवृत्ती प्रदान सोहळय़ात त्याने विविध खेळांतील दहा उदयोन्मुख खेळाडूंना प्रत्येकी 70 हजार रुपये देण्याचे वचन दिले. शिवम दुबेच्या या निर्णयाचे साऱयांनीच कौतुक केले. दुबे म्हणाला, मी या कार्यक्रमासाठी सोहळय़ाला येत असताना टीएनसीएचे सचिव बाबा यांनी कल्पना दिली की, या कार्यक्रमात आम्ही दहा खेळाडूंना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या शिष्यवृत्ती प्रदान सोहळय़ात खेळाडूंना 30 हजार रुपये दिले जाणार होते, याबाबत दुबे आपल्या भाषणात म्हणाला, ही रक्कम तुम्हाला छोटी वाटू शकते, पण ती तुम्हाला प्रोत्साहन देणारी आहे. जेव्हा तुम्ही युवा असता तेव्हा तुमच्यासाठी प्रत्येक बक्षीस आणि पुरस्कार मोलाचा असतो. या मुलांना माझ्याकडूनही प्रोत्साहन मिळावे म्हणून मी या दहा खेळाडूंच्या रकमेत प्रत्येकी 70 हजारांची वाढ करत असल्याचेही वचन दुबेने दिले.