
नवी मुंबई विमानतळ नोकर भरतीत प्रशासन तसेच सत्ताधाऱ्यांकडून प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली जात आहे. तसेच दि. बा. पाटील यांचे नाव देण्यातही केंद्र सरकार चालढकल करून अन्यायाचा वरवंटा फिरवत आहे, त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली असून नोकर भरतीत दगाफटका कराल तर याद राखा.. आंदोलन करू, असा इशारा विमानतळ प्रशासनाला दिला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पनवेल, उरण तालुक्यातील 27 गावांमधील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. मात्र आता नोकर भरती करताना स्थानिकांना डावल न परप्रांतीयांना पायघड्या घातल्या जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच विमानतळाच्या नामांतराच्या मुद्यावरही सरकार जाणीवपूर्वक मूग गिळून गप्प असल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या नेतृत्वाखाली लवकरच विमानतळ प्राधिकरणाला जाब विचारण्यासाठी आंदोल न केले जाणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते बबन पाटील यांनी दिली.
…तर सरकारला धडा शिकवू
आंदोलन तसेच नामांतराच्या मुद्यावर रणनीती ठरवण्यासाठी नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार बाळ माने, बबन पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते, महिला आघाडी जिल्हा संघटक सुवर्णा जोशी उपस्थित होत्या. इथल्या नोकऱ्या तसेच इतर कामांवर स्थानिकांचा पहिला हक्क असून तो डावलल्यास सरकारला धडा शिकवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. विमानतळ प्राधिकरणाने लवकरात लवकर नोकर भरतीची माहिती जाहीर करावी तसेच उड्डाण तयारीपूर्वी विमानतळाचे नामकरण करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.