छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यात सोमवारी शिवसंकल्प मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी यांनी मिंधे सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला केला. अनेक फसव्या योजना आणणाऱ्यांना आता बळी पडून नका. राज्याचा स्वाभिमान जपण्यासाठी ही महत्त्वाची लढाई आहे. ही एकजुटीने लढून खोके सरकार आपल्याला घालवायचे आहे आणि राज्याचा स्वाभिमान बुलंद करायचा आहे, अशी गर्जना आदित्य ठाकरे यांनी केली.
एवढ्या प्रवासानंतर थकवा येतो. मात्र, इथे आल्यावर आपला थकवा दूर झाला आणि लढण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. लोकसभेला तुम्ही विजय मिळवून दिला आता विधानसभेतही तुम्ही मशाल पेटवणार आहात का, असा सवाल त्यांनी केला. ही महाराष्ट्र स्वाभिमान सभा आहे. आपल्या राज्याचा स्वाभिमान आणि अस्मिता जपण्यासाठी ही विधानसभेची लढाई महत्त्वाची आहे.
महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता, ओळख चिरडण्यासाठी भाजप आणि मिंधे तयारी करत आहेत. त्यांना चिरडायचे काम आपल्याला करायचे आहे. राज्यात निवडणुका होणार आहेत की नाही, याबाबत काहीही माहिती नाही. कदाचित वर्षाअखेरीपर्यंत निवडणुका लागण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावेळी काय निर्णय घ्यायचा आहे, ते आतापासूनच आपल्याला ठरवायला हवे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी पाळला होता. निवडणुका कधी आहे, याचा त्यांनी विचार केला नाही. आपण राजाकारण करत नाही. आपण शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. अशा पद्धतीने महाविकास आघाडीचे काम सुरू होते. आता शेतकरी संकटात असताना सरकारमधील कोणीही शेतकऱ्यांच्या बांधांवर फिरकलेला नाही.
घाबरू नको, आम्ही तुमच्यासोबत आहोत, या उद्धव ठाकरे यांच्या विश्वासामुळे अनेक शेतकऱ्यांना उभारी मिळाली. मात्र, आता राज्यात मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे. अनेक फसव्या योजना आणल्या जात आहेत. पैसे आले, पैसे आले, असे विचारणारे हे पहिले मुख्यमंत्री आहे. गेल्या 10 वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या खात्यात ते 15 लाख जमा करणार होते, आता ते 1500 रुपये लाडक्या बहिणींना देत आहेत. आता पुन्हा यांचे सरकार आले तर 1500 चे 15 रुपये व्हायला वेळ लागणार नाही, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगवला.
राज्यात महिला सुरक्षित नाहीत. महिलांवर अत्याचार होत आहे, अशा घटना रोखण्यासाठी आपल्याला या सरकारला हटवावेच लागेल. बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेबाबत आठवडाभर एफआयआर घेण्यात आला नाही. पोलिसांनी तसे आदेश देण्यात आले होते. भाजपशी संबंधित व्यक्तीची शाळा असल्याने असे आदेश देण्यात आले होते. जनतेच्या संतापांचा उद्रेक होताच, लाठीमार करण्यात आला. 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. किसन कथोरे यांनी हे आंदोलन राजकीय असल्याचा आरोप केला, मिंधे गटाचे वामन म्हात्रे प्रसारमाध्यमांच्या महिला प्रतिनिधीला अर्वाच्य भाषेत बोलतात. सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणाऱ्या पालकमंत्र्यांना हटवण्यात येत नाही. उद्धव ठाकरे यांनी हाकललेल्या मंत्र्यांना मिंधे आणि भाजपने पुन्हा मंत्री केले आहे. अशा घटना घडत असतात, असे संतप्त व्यक्तव्यही त्या मंत्र्याने केले आहे.
बलात्कारांना सोबत घेऊन फिरणारा भाजप आहे. बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींचा सत्कार करण्यात आला. कर्नाटकात रेवण्णा या बलात्कारांच्या प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी गेले होते. अशा भआजपकडून न्यायाची अपेक्षा काय करणार, त्यांना भाऊ कसे म्हणणार. आंदोलन करणाऱ्या महिलांवर, जनतेवर लाठीमार करण्यात येतो. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा रस्ता अडवण्यात येतो, त्यांच्यावर गोळीबार करण्यात येतो, शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या भाजपला आता कोणीही साथ देणार नाही. देशातील महिला, बेरोजगार तरुण, सर्वसामान्य जनता, शेतकरी कोणताही घटक समाधानी नाही.
भाजपच्या मनात महाराष्ट्राबाबत द्वेष आहे, महाराष्ट्राबाबत आकस आहे, त्यामुळे ते असे खेळ करत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला पुढाकार घेण्याची गरज आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी निवडणुकीच्या आधीचे हे दोन महिने महत्त्वाचे आहेत. ते आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, आपल्यात भांडणे लावतील, अेक फसव्या योजना आणतील, या कशालाही आपण बळी पडायचे नाही. आपल्या एकीचे बळ आपली वज्रमुठीच्या ताकदीने आपण महाराष्ट्राचा स्वाभिमान बुलंद करू, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.