मुंबई आमच्या हक्काची… आवाज मराठीचा

मेळाव्यासाठी आलेल्या मराठीप्रेमींच्या हातातील पोस्टर्स व बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ‘मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची… जे मराठी असूनही गप्प आहेत, ते परक्यांपेक्षा वेगळे नाहीत… मराठी भाषा शिक, नाहीतर निघ… उठ मराठ्या जागा हो… ठाकरे आमचे दैवत… महाराष्ट्रात ब्रँड फक्त ठाकरे… असे शेकडो पोस्टर लोकांनी स्वतःच्या हातांनी बनवून आणले होते. महाराष्ट्रात इतिहास घडवायला ‘ठाकरे’च लागतात अशा आशयाचे पोस्टर घेऊन मुलुंडचे शैलेश पांचाळ मेळाव्यात सहभागी झाले होते. तर माय मराठी या संस्थेने ‘वारकरी स्वर्ग अवतरले पंढरपुरी, माय मराठी आमची जगात भारी…’ असे पोस्टर झळकावले. ‘मराठी शाळांचे सक्षमीकरण करा’, ‘व्यवसाय- धंद्यांचे परवाने फक्त स्थानिक भूमिपुत्रांनाच द्या’, अशा आशयाची पोस्टर्स लक्ष वेधत होती.

एनएससीआय डोम येथील मुख्य प्रवेशद्वारावरच लावण्यात आलेल्या कमानीवरील ‘मराठीचा गौरव’ सर्वांनाच आकर्षित करणारा होता. ‘आवाज मराठी’चा, ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…’ अशा कवितांच्या ओळी आणि संत ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठलाची प्रतिमा मराठी अभिमान व संस्कृती दर्शवत होत्या. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भलेमोठे पोस्टर लावण्यात आले होते. ‘मी मराठी’ असे लिहिलेली टोपी आणि टी-शर्ट घालून अनेकजण विजयी मेळाव्यात सहभागी झाले होते. ‘मी मराठी’ लिहिलेली टोपी खरेदी करण्यासाठी स्टॉलवर गर्दी झाली होती.

वाजतगाजत मराठीप्रेमींचा जल्लोष

हातात भगवे झेंडे, डोक्यावर फेटा, नऊवारी साडी असा मराठमोळा पोशाख परिधान करून… ढोल-ताशांचा गजर आणि लेझीमच्या तालावर थिरकत सकाळपासून मराठीप्रेमींनी या ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी वरळीत गर्दी केली होती. डोम सभागृहात उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी मराठी संस्कृतीचा डंका घुमला. महिलांनी मराठी गीतांच्या तालावर ठेका धरत, फुगड्या घालत जल्लोष केला. हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं. त्यामुळे विजयाची गुढी घेऊन काहीजण या मेळाव्यात सहभागी झाले होते.

मराठीवर अमराठी बांधवांचेही प्रेम!

मराठी भाषेवर प्रेम करणारे काही अमराठी बांधवदेखील सहभागी मेळाव्यात झाले होते. ‘मी गुजराती असलो तरी महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान ठेवावाच लागणार,’ असा संदेश चांदिवलीच्या भानुशाली यांनी पोस्टरवरून दिला. तर ‘जे मराठी असूनही गप्प आहेत ते परक्यांपेक्षा वेगळे नाहीत’ असा संदेश कांदिवलीतील शीला पटेल यांनी दिला.

मराठी हाच अजेंडा!

कोणताही झेंडा नाही… फक्त मराठीचाच अजेंडा. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी वाजतगाजत, गुलाल उधळत विजयी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा न आणता केवळ माय मराठीच्या प्रेमासाठी एकत्र आले होते. मराठीसाठी काम करणाऱ्या संघटना देखील मेळाव्यात सहभागी होत्या.

शिवसेनाप्रमुखांचा ‘तो’ फोटो ठरला आकर्षण

मेळाव्याच्या परिसरात आणि सभागृहात झळकणारे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना आशीर्वाद देत असलेला एक बॅनर मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात आला होता. या बॅनरपाशी सगळेच थबकत होते.

छोट्या शिवसैनिकाने वेधले लक्ष

मेळाव्यात विरारवरून आलेल्या समर्थ दिनेश आदावडे या चार वर्षीय चिमुकल्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या. भगव्या रंगाचा फेटा घालून आपल्या भगव्या रंगाच्या सायकलवरून कार्यक्रमस्थळी आलेल्या छोटय़ा शिवसैनिकाने निष्ठsचेच दर्शन घडवले. ‘ठाकरे हे नाव नाही, तर आधुनिक महाराष्ट्राचा ब्रँड आहे’ असे पोस्टर त्याच्या सायकलवर झळकत होते.

‘ब्रँड’ ठाकरे… ‘ग्रँड’ एन्ट्री

मराठी विजय मेळाव्याच्या व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झालेली एन्ट्री चर्चेचा विषय ठरली. दोघा भावांच्या प्रवेशावेळी सभागृहात अंधार करण्यात आला. त्यामुळे उत्कंठा वाढली. हा क्षण टिपण्यासाठी अधीर झालेल्या मराठीप्रेमींनी आपल्या मोबाइलचे टॉर्च सुरू केले. त्यावेळी सभागृह हजारो दिव्यांनी उजळून निघाले.

सात थरांनी मराठी एकजुटीला सलामी

‘उपनगरचा राजा’ अशी ख्याती असलेल्या जोगेश्वरी पूर्व येथील ‘जय जवान’ गोविंदा पथकाने या मेळाव्यात सात थर लावून मराठी माणसाच्या एकजुटीला सलामी दिली. विजयी मेळाव्याला आलेल्या प्रत्येकाला पेढे देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात येत होते.