मुंबईत मंगळवारी मार्मिकच्या 64 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिध्यांना आणि भाजपला चांगलेच फटकारे लगावले. हा फक्त एका साप्ताहिकाचा वर्धापनदिन नाही, तर एक वारसा आणि वसा यांचा वर्धापनदिन आहे. हा वसा आपल्याला पुढे न्यायचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या तंगड्या पकडून त्यांना खेचण्याची वेळ आली आहे, असेही उद्धव ठाकरे कडाडले.
अशा कार्यक्रमात बोलण्याची पंचायत असते, रंगलेल्या कार्यक्रमात व्यत्यय आल्यासारखे वाटते. आता बोलताना मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी मार्मिकचे वय सांगितले. तेव्हा माझे सांगायची गरज नव्हती. सांगितले तरी हरकत नाही. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र असल्याने त्यांच्याकडूनच काही धडे गिरवले आहे. शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे वय प्रत्येकाचे वाढत पण माणूस मनाने जो थकतो, तेव्हा तो वयस्कर होतो. मार्मिक 64 वर्षांचे झाले तरी आजही ताजातवाना आणि तरुण आहे. आतापर्यंतची सगळी व्यंगचित्र आणि मुखपृष्ट समोर आल्यानंतर तो काळ समोर उभा राहतो. याबाबतच्या आठवणी सांगण्यासाठी मार्मिकचा प्रवास असा कार्यक्रम ठेवावा लागेल, असेही ते म्हणाले.
मार्मिक, सामना आणि शिवसेना हे चमत्कार आहेत. एका व्यंगचित्रकाराने कुचंल्याच्या आधारे हे सर्व, ही दुनिया उभी केली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षातून राज्य नुकताच बाहेर पडले होते. त्यावेळी मार्मिककार बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला व्यंगचित्रातून जनतेला थोडी करमणूक दिली. तो काळ भारावलेला होता. मार्मिकचा आणि माझा जन्म एकाच सालचा आहे. आज मी मार्मिक आणि सामनाचा संपादक आहे. शिवसेनेचा नारळ माझ्यासमोरच फुटला आहे. त्या नारळातील उडालेल्या शिंतोड्यांनी मला पूर्ण भिजवून टाकले, आता मी पक्षप्रमुख आहे. हा वारसा घेऊन मी पुढे जात आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. हा वारसा घेत आपण पुढे जात आहे. तुम्ही सर्व सोबत असताना मी शत्रूची पर्वा का करावी.
मुंबई आपण मिळवली पण परप्रांतीयांची संख्या जास्त होती. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत होता. त्याकाळी स्थानीय लोकाधिकार समितीने केलेले कार्य सर्वांसमोर आहे. आता शिवराय संचलन बघण्यासाठी दुतर्फा गर्दी होते. पुर्वी याच काळात मराठी माणसाला प्रवेश नव्हता. आता तिथे मराठी माणून अभिमानाने फिरत आहे. हाच आपला अभिमान आहे. हीच आपली ताकद आहे. टेलिफोन डिरेक्टरीत मराठी माणसांची नावे नव्हती. त्याकाळी वाचा आणि शांत बसा अशी परिस्थिती होती. लोकं जमा होत होती. आजोबांनी बाळासाहेबांना विचारले हे सर्व करतोय, पुढे काय विचार आहे, संघटना करण्याचा विचार आहे काय, त्यावेळी त्यांनी एका क्षणात प्रबोधनकारांनी शिवसेना हे नाव सुचवले आणि शिवसेना सुरू झाली. आता आमच्याकडे जास्त वर्गणीदार म्हणून मार्मिक आमचा असेही काहीजण म्हणतील, असा टोलाही त्यांनी लगावला. काहीजण हॉटेल बुक करतात. त्यानंतर या हॉटेलमधील सर्व खोल्या माझ्या नावावर बुक आहेत, आजापासून हे हॉटेल माझे, अशी लाचारी सुरू आहे.
माझे आजोबा प्रबोधनकार संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते. वाचा आणि थंड बसा या शिर्षकाऐवजी वाचा आणि उठा हे शिर्षक झाले आणि शिवसेनेचा जन्म झाला. एअर इंडियात मराठी माणसाला प्रवेश कसा मिळाला, कानाखाली आवाज आल्यानंतर मराठी माणसासाठी दरवाजे उघडले. आताही पुन्हा संघर्षाची परिस्थिती आहे. त्या काळात कुंचल्याचा पलिता झाला होता. आज म्हणूनच आपण मशाल हाती घेतली आहे. आपण व्यंगचित्र काढत नाही, पण शब्दांनी बरेचकाही मांडतो आणि जनतेलाही ते पटते. आता मशालची धग त्यांच्या बुडाला लावायची वेळ आली आहे. तसेच आपल्या मतांवर दिल्लीत जाणारे, महाराष्ट्रद्वेष्ट्ये आपल्यालाच लाथ घालत असतील, तर त्यांची तंगडी पकडून खेचण्याची गरज आहे.
कसा जगायचे याचे मार्गदर्शन मार्मिक करते. अशा संघर्षाच्या परिस्थितीत एका खणखणीत आवाजाची गरज आहे. तो खणखणीत आवाज म्हणजे मार्मिक आणि सामना आहे. आज आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले आपले नेतृत्व मान्य करत आहेत. हे त्यांचे मोठेपण आहे. हा फक्त साप्ताहिकाचा वर्धापण दिन नाही, तर एका वारशाचा आणि घेतलेल्या वसाचा वर्धापनदिन आहे. हा वारसा आणि वसा पुढे न्या, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.