परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांविरोधात वसईतील शिवसैनिक आक्रमक, काळ्या फिती दाखवत ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात आज वसईतील शिवसैनिक आक्रमक झाले. काळ्या फिती दाखवत त्यांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा जोरदार घोषणा दिल्या. या सरकारचं करायचं काय.. खाली डोकं वर पाय, असा गगनभेदी नारा दिल्याने सरनाईक यांचे समर्थक अस्वस्थ झाले. आंदोलनाची परवानगी नाही असे कारण पुढे करत पोलिसांनी सुमारे 20 शिवसैनिकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

महापालिका मुख्यालयात आज लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान प्रताप सरनाईक हे नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आले. आलिशान गाडीतून त्यांचे आगमन होताच असंख्य शिवसैनिकांनी महायुती सरकारचा तसेच मंत्र्यांचा निषेध करत तुफान घोषणा दिल्या. यावेळी शिवसैनिकांनी काळ्या फिती लावल्या होत्या. परिवहन मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची परवानगी मिळावी यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर यांनी बोळिंज पोलीस ठाण्याकडे मागणी केली होती. मात्र ती नाकारण्यात आली. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी ही शिवसैनिकांनी लोकदरबारासाठी आलेल्या परिवहन मंत्र्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, जिल्हा संघटक जनार्दन पाटील, महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, लोकसभा संघटक विवेक पाटील, उपजिल्हा संघटक भारती गावडे, तालुकाप्रमुख प्रथमेश राऊत, काकासाहेब मोटे, विरार शहरप्रमुख उदय जाधव, नायगाव शहरप्रमुख मंगेश चव्हाण, शहर संघटक शशीभूषण शर्मा, भूपेश राऊत, जितेंद्र राऊत, सचिन म्हात्रे, समाधान निकम, अनंत नाईक, दिनेश आदावडे, विनायक लाड, अनंत घाग सहभागी झाले होते.