
देवेंद्र फडणवीस सरकारची निर्मितीच खोक्यातून झाली आहे, त्यामुळे फडणवीस यांनी खोक्यावर बोलून नये, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. तसेच कैलास गोरंट्याल यांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. तसेच ही निवडणूक भाजपने कशी जिंकली आहे, ते आता जनतेला समजले आहे, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस सरकारची निर्मिती खोक्यांतून झालेली आहे. 50 खोके, एकदम ओके, ही घोषणा कोणी दिली? या घोषणेचा जनक कैलाश गोरंट्याल आहे. ते त्यावेळी जालन्याचे आमदार होते. त्यांनी विधानसभा सुरु असताना ही घोषणा दिली आणि नंतर ती देशभरात पसरली. आता ही घोषणा देणार गोरंट्याला फडणवीस यांच्या पक्षात आहेत. त्यांनीच आता असे सांगितले आहे की, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकाएका मतदारसंघात 100-100 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सरकारी वाहने आणि पोलिसांच्या वाहनातून हे पैशांचे वाटप सुरू होते. आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार, त्यामुळे आपल्याला भाजपमध्ये यावे लागले, असे गोरंट्याल म्हणाले आहेत. त्यामुळे खोक्याची भाषा फडणवीस यांनी करू नये.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या 100 जागांवर फेरीफेरी करत विजय मिळवला आहे, त्याबाबत फडणवीस यांनी बोलावे, त्यांच्या मंत्रीमंडळात असलेल्या भ्रष्ट मंत्री असून त्यांची खोक्यांची ओढताण सुरू आहे, त्याबाबत त्यांनी बोलायला पाहिजे. राज्यात शेतकऱ्यांच्या आतम्हत्या होत आहेत, बेरोजगारी वाढत आहे, त्याबाबत फडणवीस यांनी बोलले पाहिजे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत, या धक्क्यातून फडणवीस सावरलेले नाहीत, त्यामुळे ते अशी विधाने करत आहेत. त्यांची वक्तव्ये विनोद समजून सोडून दिली पाहिजेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.