महाराष्ट्रात शिवद्रोही सरकारच्या विरोधात राज्यभर जोडो मारो आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात मुंबईपासून होणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकरली असली तरी लोकशाहीत जनतेला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे हे आंदोलन होणारच आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावले. हे आंदोलन रोखण्यामागे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी याबाबत माफीही मागितली नाही. तसेच छत्रपती शिवरायांचा अवमान होत असलेला पाहून ते शांत राहिले. छत्रपती शिवरायांचा एवढा अपमान मोगलांच्या काळातही झाला नव्हता. फडणवीस हे महाराष्ट्रासाठी खलनायक आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.
पोलिसांनी परवानगी नाकरली असली तरी हे आंदोलन होणारच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मुंबईत या आंदोलनाची सुरूवात होणार आहे. तसेच राज्यभर ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.
आम्हाला अडवण्याचा आमच्या कार्यकर्त्यांची वाहने अडवण्याचा प्रयत्न सकाळपासून सुरू आहे. मुंबईत आज लोकलचा मेगाब्लॉक आहे. आमचे कार्यकर्ते पोहचू नयेत, यासाठी मोगाब्लॉकचा वेळ वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आमचे कार्यकर्ते वाहनांने येत आहेत. तर त्यांची वाहनेही अडवण्यात येत आहे. त्यांना एवढी कसली भीती वाटत आहे. ते कशाला घाबरत आहेत, असा सवालही त्यांनी केला.
या सर्वांचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस हे आहेत, हे जनतेसह सर्वांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महारांजाचा एवढा अवमान झाला असताना जनता गप्प बसणार नाही. जनता नामर्द नाही. आम्हाला रोखण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, लोकशाहीत आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांना आम्हाला अटक करायची असेल, तर ते करू शकतात. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील खलनायक आहे, अशीच इतिहासात त्यांची नोंद होणार आहे, असेही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आंदोलन करण्याला विरोध होत आहे. असे आंदोलन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भाजप विरोध करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि फडणवीस गप्प बसले. राज्यपालांनी शिवरायांचा अवमान केला, तेव्हाही ते गप्प बसले होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत पुतना मावशीचे प्रेम आहे, हे दिसून येते. सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होत आहे, तेवढा मोगलांचा काळातही झाला नाही. त्यामुळे फडणवीस हे महाराष्ट्राचे खलनायक असल्याचे दिसून येत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.