काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची शनिवारी भेट झाली. या भेटीनंतर आजच्या आज जागावाचपाचा विषय मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच दाऊद इब्राहिमशी संबंधीत अनेकजण भाजपत असल्याचे सांगत त्यांनी जबरदस्त टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मातोश्रीवर शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत काही मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद किंवा मनभेद नाहीत. दोन दिवसांपासून जागावाटपाच्या चर्चेची गती मंदावली होती. आता दुपारी 3 वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार असून आज रात्री उशीरापर्यंत हा विषय मार्गी लावण्यात येईल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
राज्यात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे वेगाने निर्णय घेत हालचाली करण्याची गरज आहे. वेगाने निर्णय घेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी लवकरात लवकर जाहीर व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आता महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षात कोणताही मोठा पेच नाही. कोणतेही वाद नाहीत. आघाडीच्या राजकारणात एखाददोन जागांवर संघर्ष असतो. कार्यकर्त्यांच्या भावना समजूत घेत निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे चर्चा वाढत असते. मात्र, आज रात्री उशीरापर्यंत बसून हा विषय मार्गी लावण्यात येणार आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असलेले अनेकजण भाजपत आहेत. दाऊदच्या जमीनी विकत घेतल्या होत्या, त्यांच्या जमीनी मोकळ्या करण्याचे काम संघ परिवाराच्या सरकारने केले आहे. याचा विसर संघ परिवाला पडलेला दिसत आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.