शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी मजबूत असून याबाबत आमची भूमिका स्पष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आता भाजप स्वबळाची भाषा करत असल्याबाबतही त्यांनी भाजपला जबरदस्त टोला लगावला. लोकसभा निवडणुकीत आम्ही आमचा दम दाखवला आहे. आता विधानसभा निवडणुकीत कोणाचा दम निघतो आणि कोणाचा दम दिसतो, ते लवकरच कळेल, असेही संजय राऊत म्हणाले.
आता भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. सध्या ते अनेक सिनेमे काढत आहेत. आता त्यांनी ‘दम मारो दम’ असा सिनेमा काढावा, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. महाराष्ट्रात कोणाचा दम असेल तर तो शिवसेनेचा आहे. शरद पवार यांच्या पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा दम आहे, लोकसभा निवडणुकीत आम्ही आमचा दम दाखवला आहे. आता त्यांनी स्वप्ने बघत फक्त दम मारो दम सिनेमा काढावा, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजप फक्त स्वार्थासाठी इतर पक्षांना सोबत घेतात. त्याचा उपयोग संपला की फेकून देतात आणि स्वबळाची भाषा, शत प्रतिशत भाजपाची भाषा ते बोलतात. हाच भाजपता खरा चेहरा आहे. त्यात काही नवीन नसल्याचही संजय राऊत म्हणाले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न केले आहेत. तसेच यासाठी सर्वच पक्षांचे योगदान आहे. त्यामुळे यात कोणात्याही एक व्यक्तीचे किंवा पक्षाचे श्रेय नाही. हा मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा सन्मान आहे. भाजपला याचे श्रेय घेण्याची घाई झाली आहे. ते श्रेय लाटण्यासाठी काहीही करू शकतात. त्यांना श्रेय घ्यायचेच असेल तर कोरोनाची जबाबदारी आणि श्रेयही त्यांनी घ्यावे, असा टोलाही सजंय राऊत यांनी लगावला.
भाजप कसेलेही श्रेय घेऊ शकते, मात्र, हा मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेच्या सन्मानाचा प्रश्न आहे. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसांचा आवाज बुंलद केला. त्यांनी कागदावर मराठी भाषेला दर्जा दिला आहे. बाळासाहेबांनी प्रत्यक्षात मराठी माणसातील स्वाभमान जागवण्याचे काम केले, याचा विसर कोणालाही पडलेला नाही.महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवण्याचे कटकारस्थान थांबवावे आणि राज्याला सन्मान द्यावा, असेही त्यांनी भाजपला सुनावले.