राज्यात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता जागावटापाच्या चर्चा वेग घेत आहेत. महाविकास आघाडीत 200 पेक्षा जास्त जागांवर एकमत झाले आहे. काही जागांचा तिढा कायम आहे. तो लवकरच सुटेल. याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली असून राज्यातील जागावाटपाबाबत लवकरच निर्णय होईल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
राज्यातील जागावाटपाला गती मिळावी, यासाठी आज सकाळी आपली मुकुल वासनिक यांच्यासह काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशीही आपली चर्चा होणार आहे. यावेळी जागावाटपाला गती देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. अनेक जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. मात्र, काही जागा अशा आहेत, ज्यावर अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. मात्र, आता खूप कमी वेळ शिल्लक आहे. राज्यातील नेत्यांना त्यांची यादी दिल्लीकडे पक्षश्रेष्ठींना पाठवावी लागते. त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येतो. पक्षाच्या प्रक्रियेप्रमाणे या गोष्टी होतात. मात्र, आता कमी वेळ असल्याने जागावाटपाबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे, असे आपले मत असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीत 200 पेक्षा जास्त जागांवर सहमती झाली आहे. काही जागांचा पेच अद्याप आहे. मात्र, महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मात्र, काही जागांवर तिन्ही पक्षांकडून दावा सांगण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत आम्ही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी दिल्लीत चर्चा केली. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांनी बैठकीतील आतापर्यंतच्या घडामोडींची माहिती दिली. त्यांनी आपल्याला काही सूचना केल्या आहेत. त्याचे आपण पालन करू. काही जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही. तो पेच लवकरच सुटेल आणि राज्यातील जागावाटपाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
भाजपकडून वोट जिहाद सुरू आहे. ट्रिपल तलाकचा घेतलेला निर्णय, किरेन रिजिजू यांचे मुस्लिमांनी आम्हाला मते द्यावी, आम्ही त्यांना मंत्रीपदे देऊ, अशी विधाने वोट जिहादच आहेत. तसेच भाजपने घडवलेले पुलवामा कांड हे देखील वोट जिहाद आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. त्यामुळे पोपटपंची करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी गप्प बसावे, अन्यथा त्यांची पोलखोल होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
महाराष्ट्रात आम्हाला भाजपशी लढायचे आहे. त्यामुळे जास्त खेचाखेची योग्य नाही, हे महाविकास आघाडीतील सर्व पक्षांना माहिती आहे. मात्र, यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा, हीच आमची इच्छा आहे. प्रत्येकाला पक्ष वाढवायचा आहे. कार्यकर्त्यांच्या भावनाही जपायच्या आहेत. रामटेक आणि अमरावतीसारख्या आमच्या हक्काच्या जागा आम्ही काँग्रेसला दिल्या आहेत. त्यामुळे आमच्याही काही अपेक्षा आहेत. त्याचा योग्य तो विचार करण्याची गरज आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
राज्यात भाजपने, मिंधे गटाने सर्वात जास्त त्रास शिवसेनेला दिला आहे. त्यांना कसे पराभूत करायचे, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे भाजपच्या भ्रष्ट सरकारचा पराभव हेच ध्येय ठेवत लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले. ही भाजपची बिश्नोई गँग आहे. त्यांच्याकडे ईडी, सीबीआयसारखी हत्यारे आहेत. त्यांचा मुकाबला करत आम्ही ठामपणे उभे आहोत. राज्यातील वातावरण बदलत आहे. येत्या 24 तासात पक्षात आणखी महत्त्वाचे प्रवेश होतील, असेही ते म्हणाले. जागावाटपाबाबत महाराष्ट्रात निर्णय झाले तर त्यांना गती येईल, कोणत्याही पेचावर समस्येवर चर्चा करत मार्ग काढता येतो. त्यामुळे आता वेळ कमी असल्याने काँग्रेसनेही जागावाटपाचे निर्णय राज्यातच होतील, अशी यंत्रणा राबवावी, अशी सूचनाही आम्ही काँग्रेसला केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.