
ताजे ताजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला माजी मानण्यास तयार नाही. त्यामुळे ते स्वतःला भावी समजतात, त्यामुळे या माजी आणि भावी मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीस यांनी सावध राहण्याची गरज आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीस आणि मिंध्यांना जबरदस्त टोला लगावला. तसेच शिंदे गट विरुद्ध फडणवीस या संघर्षावरही त्यांनी मत व्यक्त केले.
माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्याला एकनाथ शिंदे गेले नाहीत. त्यामुळे ते स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणवून घेण्यास तयार नाहीत. ते ताजे ताजे माजी मुख्यमंत्री आहेत. आमचे वैचारिक मतभेद असल्याने आम्ही गेलो नाही. मात्र, शिंदे गेले नाहीत, याचा अर्थ ते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री मानण्यास तयार नाहीत, असे दिसून येते. ते स्वतःला मोजी म्हणवण्यास तयार नाहीत, म्हणजे ते भावी आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत, तर फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या सूचना असल्याशिवाय अजित पवार असे निर्णय घेणार नाहीत. त्यामुळे हा संघर्ष अजित पवार विरुद्ध शिंदे गट असा नसून शिंदे गट विरुद्ध फडणवीस असा आहे.मुख्यमंत्र्याच्या आदेशिवाय अजित पवार शिंदे गटाचे बूच लावू शकत नाहीत. फडणवीस हे सरळमार्गी राजकारणी नाहीत. त्यामुळे त्यांचा याला पाठिंबा आहे. हे दिसून येते, असेही ते म्हणाले. तसेच जे अजित पवार यांना शकुनी म्हणू शकतात, ते फडणवीस यांना दुर्योधन म्हणण्यास कमी करणार नाही, असेही ते म्हणाले.