जिल्हा रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेला मुलगा झाल्याची नोंद करून हाती मुलगी सोपविण्यात आल्याने नातेवाईकांनी आक्षेप घेतला आहे. मुलगा जन्माला आल्याने मुलगाच द्यावा, अशी मागणी नातलगांनी केली आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून, त्या अहवालानंतर मुलगा की मुलगी याबाबत अंतिम स्पष्टता होईल.
नाशिकच्या नांदुर नाका भागातील महिला 13 ऑक्टोबरला रात्री प्रसूत झाली. तिला मुलगा झाल्याची माहिती संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांनी नातलगांना सांगितली. कागदोपत्री तशी नोंदही करण्यात आली. उपचारासाठी बाळाला स्वतंत्र कक्षात आईपासून दूर ठेवण्यात आले. ते बाळ मुलगी असल्याचे नातलगांच्या निदर्शनास आले. सदर महिलेने मुलालाच जन्म दिला असून, मुलगाच द्यावा, अशी मागणी करीत नातलगांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे यांच्याकडे मागणी केली. याप्रकरणी शिंदे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. कागदोपत्री मुलाची नोंद असली तरी सर्व संबंधित सीसीटीव्ही फुटेज व अन्य वस्तुस्थिती तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी अहवाल प्राप्त होईल, त्यानंतर अंतिम वस्तुस्थिती सांगता येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.
‘त्या’ दिवशी चारही मुलीच जन्मल्या
जिल्हा रुग्णालयात 13 ऑक्टोबरच्या रात्री चार प्रसूती झाल्या, त्या महिलांनी मुलींनाच जन्म दिला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. कागदोपत्री मुलगा अशी नोंद झाल्याने गोंधळ वाढला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.