निवडक वेचक – 1,279 रुपयांत करा विमान प्रवास

एअर इंडिया एक्स्प्रेस विमान कंपनीने विमान प्रवाशांसाठी खास हिंदुस्थानच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त फ्रीडम सेल ही योजना आणली आहे. 19 ऑगस्ट ते 31 मार्च 2026 पर्यंत केवळ 1 हजार 279 रुपयांत देशांतर्गत तर 4,279 रुपयात आंतरराष्ट्रीय प्रवास करता येईल. त्यासाठी बुकिंग 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहाणार आहे. एकूण 50 लाख प्रवाशांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

पीएम इंटर्नशीपमधील त्रुटी दूर करणार

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या पहिल्या दोन फेऱ्यांचे निकाल निराशाजनक होते. त्यामुळे कंपनीचे स्थान, वयोमर्यादा अशा एकूण चार त्रुटी दूर करून मग ही योजना राबवण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने एक रोडमॅप तयार केला आहे.

इस्रो अमेरिकन उपग्रहाचे प्रक्षेपण करणार

हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था पुढच्या दोन महिन्यांत अमेरिकेचा तब्बल 6 हजार 500 किलो वजनाचा दूरसंचार उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हिंदुस्थानच्या भूमीवरून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येईल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायण यांनी दिली.

धरालीत मोबाईलइंटरनेट सेवा सुरू

ढगफुटीमुळे चिखल, दगडमातीच्या लोंढय़ात हॉटेल्स, घरे आणि होम स्टे वाहून गेले. 150 हून अधिक लोक गाडले गेले. आतापर्यत 650 पर्यटकांना वाचवण्यात आले. या नैसर्गिक आपत्तीमुळे बंद असलेले मोबाईल, इंटरनेट सेवा पुन्हा सुरू केली आहे.

इस्रायल गाझा ताब्यात घेणार; इराण संतापला

इस्रायलने गाझा पूर्णपणे ताब्यात घेण्याची तयारी आणखी तीव्र केली आहे. इस्रायलचे अडीच लाख सैन्य गाझाकडे कूच करण्यासाठी सज्ज झाले आहे. गाझामध्ये कारवाई सुरू केली तर त्याचे वाईट परिणाम होतील असा इशारा इराणने दिला आहे.