
देशात दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून त्याचे ठळक परिणाम आता दिसू लागले आहेत. देशातील 10 शहरांमध्ये दरवर्षी सुमारे 33,000 मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होतात, असं लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थच्या अभ्यास अहवालातून समोर आलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने स्वच्छ हवेचे निकष निश्चित केले आहेत. या निकषांमध्ये निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वापेक्षा म्हणजेच प्रत्येक घनमीटर हवेतील 15 मायक्रोग्रॅमच्या पेक्षा हे प्रमाण जास्त आहेत. प्रदूषित हवेच्या धोक्यांपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी हिंदुस्थानने किमान WHO मार्गदर्शक तत्त्वांशी जुळण्यासाठी स्वच्छ नियम कडक केले पाहिजेत, असं अहवालात नमूद केलं आहे.
अभ्यासकांनी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी पीएम 2.5 एक्सपोजर असलेल्या 10 शहरांमधील 2008 ते 2019 दरम्यान मृत्यूची दैनिक संख्या या डेटाचा आधार घेतला आहे.
वायू प्रदूषणानं इतकी उच्च पातळी गाठली आहे की देशाच्या हवेच्या गुणवत्तेच्या मानकांपेक्षा ते खूप दूर आहे. असं असल्यानेच देशात दररोज मृत्यूचे प्रमाण वाढते आहे, असं अभ्यासात आढळून आलं आहे.
‘अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे, शिमला आणि वाराणसी अशा देशातील 10 शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे 33,000 मृत्यू होत आहेत’, असं या अहवालात म्हटलं आहे.
‘मुंबई, बेंगळुरू, कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या खूप मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण नसलेल्या शहरांमध्येही मोठ्या संख्येने मृत्यू झाल्याचं दिसून आले आहे’, असं त्यामध्ये म्हटलं आहे. ‘हिंदुस्थानचे राष्ट्रीय हवेच्या गुणवत्तेचे मानक अधिक कठोर केले पाहिजेत आणि वायू प्रदूषण दुप्पटीने नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत’, असं देखील यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
अभ्यास कालावधीत वायू प्रदूषणाशी संबंधित मृत्यूंची सर्वाधिक संख्या दिल्लीमध्ये नोंदवली गेली आहे. 11.5% म्हणजेच दरवर्षी 12,000 मृत्यू या शहरात केवळ वायू प्रदूषणामुळे होतात.
या कालावधीत वाराणसीत दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. 10.2% म्हणजे वर्षाला सुमारे 8300 मृत्यू वायू प्रदूषणामुळे होत आहेत, असं अभ्यासात दिसून आलं आहे. एनडीटिव्हीच्या वृत्तात ही माहिती दिली आहे.
अभ्यास कालावधीत वाढत्या वायू प्रदूषणामुळे बेंगळुरूमध्ये सुमारे 2,100, चेन्नईमध्ये 2,900, कोलकात्यात 4,700 आणि मुंबईत दरवर्षी सुमारे 5,100 मृत्यू झाले.
सर्वात कमी वायू प्रदूषणाची पातळी शिमल्यात नोंदवली गेली. मात्र तरीही वायू प्रदूषणामुळे डोंगराळ भागात 3.7% मृत्यूचा धोका आहे कारण इथे दरवर्षी 59 मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होत आहेत.