
तापमानातील अचानक चढ-उतार, दमट वातावरण आणि थ्रिप्स तसेच तुडतुड्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदा कोकणासह राज्यातील आंबा बागांमध्ये मोहोर टिकला नाही. यंदा मोठ्या प्रमाणावर मोहोर असूनही प्रत्यक्षात फळधारणा कमी झाल्याने उत्पादन सुमारे साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत घटल्याचा अंदाज शेतकरी, व्यापारी वर्तवत आहेत. परिणामी सध्या बाजारात हापूस आंब्याचा तुटवडा जाणवू लागला असून दरही गगनाला भिडले आहेत. गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांकर येऊन ठेपला असला तरी यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंबा मिळणे कठीण आहे. त्यामुळे यंदा पाडव्याला केरळ, कर्नाटक आणि बाणकोट येथील आंब्यावर तहान भागवावी लागण्याची चिन्हे आहेत.
बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा आंबा उत्पादनाला बसला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांत सुरुवातीला आंब्याला विक्रमी मोहोर आला होता. मात्र त्यानंतर तापमानातील अचानक चढ-उतार, दमट वातावरण आणि थ्रिप्स तसेच तुडतुड्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने मोहोर टिकला नाही. अनेक बागांमध्ये कांजमोहोर दिसून आला, तर कोकळ्या फळांची मोठ्या प्रमाणावर गळ झाली. त्यामुळे अपेक्षित उत्पादन न मिळता केवळ 30 ते 40 टक्केच उत्पादन हाती येत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्पादनात झालेल्या मोठ्या घटीमुळे आंबा बागायतदारांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. बागांची राखण, औषध फवारणी आणि मजुरीचा खर्च काढलेला असतानाच उत्पन्न घटल्याने बागायतदार अडचणीत आले आहेत. काही ठिकाणी खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी बागांची राखण करणारे गुरखेही यंदा ठेवले नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, उत्पादन घटल्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात गेल्या वर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात दररोज दोन ते तीन हजार पेट्यांची आवक होत होती. मात्र यंदा सध्या केवळ 150 ते 200 पेट्यांपर्यंतच आकक मर्यादित आहे. त्यामुळे बाजारात हापूस आंब्याचा तुटवडा जाणवत असून सध्या प्रतिडझन अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत दर पोहोचले आहेत.





























































