
आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रेया घोषालने नुकतेच मुंबईत एक आलिशान घर खरेदी केले आहे. आई शर्मिष्ठा घोषाल आणि वडील बिस्वजीत घोषाल यांच्यासोबत, मुंबईतील वरळीमध्ये २९.७० कोटी रुपयांचे एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. स्क्वेअर यार्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, हे अपार्टमेंट गोदरेज ट्रिलॉजी, वरळी येथे आहे. या प्रॉपर्टीचे कार्पेट क्षेत्रफळ २४३०.०६ चौरस फूट आणि एकूण क्षेत्रफळ २७५०.२८ चौरस फूट आहे. यामध्ये तीन कार पार्किंगची जागा देखील आहे. खरेदीमध्ये ₹१.७८ कोटींचे मुद्रांक शुल्क आणि ₹३०,००० चे नोंदणी शुल्क समाविष्ट आहे. या व्यवहाराची नोंदणी १ एप्रिल २०२६ रोजी झाली आहे.
दक्षिण मुंबई, लोअर परळ आणि वांद्रे यानंतर, आता वरळी मोठ्या स्टार्स आणि उद्योगपतींची पसंतीचे ठिकाण बनत आहे. वांद्रे-वरळी सी-लिंक, ॲनी बेझंट रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून असलेल्या उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीमुळे या विभागातील जागांचे भाव आता वाढू लागले आहेत. एका अहवालानुसार, वरळीतील उच्च दर्जाच्या अपार्टमेंटच्या किमती आता प्रति चौरस फूट १ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्या असून, त्या न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनमधील किमतींशी स्पर्धा करत आहेत.





























































