नवसाला पावणारी श्री सोमजाई माता

सामना प्रतिनिधी । कर्जत

कर्जत नगरपरिषद क्षेत्रामध्ये असलेल्या गुंडगे गावामध्ये श्री सोमजाई माता नवसाला पावणारी व भक्तांच्या पाठीशी राहणारी देवी म्हणून प्रसिध्द आहे.

या देवीची अख्यायिका अशी की, पूर्वी या ठिकाणी एक ऋषी येत असत. त्यानी सोमजाई मातेचे दर्शन घेऊन तपश्चर्या केली. त्यांना देवीने दृष्टांत दिला होता. तसेच ब्रिटिश काळामध्ये कर्जत – पुणे मध्य रेल्वेचे काम चालू होते. त्यावेळेस रेल्वेच्या कामांमध्ये असंख्य अडचणी येत होत्या. तेथे काम करणाऱ्या मजुरांना साप किंवा विंचू चावणे असे प्रकार घडत असत. त्यावेळी कामावर देखरेख करण्यासाठी भोसले नावाचे मुकादम होते. ते या घटनांमुळे त्रस्त झाले होते. तेंव्हा त्यांनी मनोमनी देवीची प्रार्थना केली व आमच्या कडून काही चूक घडत असेल तर आम्हाला साक्षात्कार व्हावा. त्याच रात्रीला आई सोमजाई मातेने भोसलेंच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला आणि मी काम चालले आहे त्याच्या शेजारीच एका मातीच्या ढिगाऱ्याखाली असून माझा जिर्णोद्धार करावा असे सांगितले. भोसले यांनी दुसऱ्याच दिवशी त्या जागेचा शोध घेऊन तो मातीचा ढिगारा साफ करुन देवीची मूर्ती बाहेर काढली व इगतपुरीहून दगड आणून ते घडवून तेथे सोमजाई मातेचे मंदिर बांधले. तेंव्हा पासून रेल्वेच्या कामात अडचणी येणे बंद झाले व काम सुरळीत पणे पार पडले.

काळाच्या ओघात मंदिर जीर्ण झाले. ग्रामस्थांनी विचार विनिमय करुन देवस्थानचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प केला व 2007 साली मोठे मंदिर उभारुन त्याचा जिर्णोद्धार केला. आता प्रत्येक वर्षी चैत्र शुध्द सप्तमीला श्री सोमजाई मातेचा उत्सव केला जातो व नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो.

आपली प्रतिक्रिया द्या