श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव सोहळा हरिनाम गजरात साजरा झाला. कीर्तन सेवेचे मानकरी संतोष महाराज मोझे सरकार यांच्या वतीने ह. भ. प. मारुती महाराज चोरट यांची सुश्राव्य हृदयस्पर्शी वाणीतून श्रींचे जन्मोत्सवावर आधारित कीर्तन सादर केले. या वेळी भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.
विविध धार्मिक कार्यक्रमात मंदिरात घंटानाद, पुष्पवर्षाव, कीर्तनसेवा, गावकरी भजन सेवा उत्साही हरिनाम गजरात झाली. भाविकांनी श्रींचे दर्शन घेत महाप्रसाद घेतला. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीतर्फे मंदिरातील परंपरेने गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप यांच्या हस्ते परंपरेने गोकूळ पूजा, मानकऱ्यांना श्रीफळ प्रसाद, भाविकांना सुंठवडा, खिरापत प्रसाद वाटप झाले.
श्रीचे जन्मोत्सव अवतार दिनी पहाटे घंटानाद, काकडा, श्रीना पवमान अभिषेक पूजा, दुधारती, 11 ब्रम्हवृन्दाच्या वेदमंत्र जयघोषात अभिषेक झाला. भाविकांचे समाधी दर्शन, दुपारी श्रीचा गाभारा स्वच्छता आणि श्रीना उपवासाचा महानैवेद्य झाल्यानंतर भजन उत्साहात झाले. हरिनाम गजरात रात्री 12 च्या सुमारास जन्मोत्सवात भाविकांनी श्रींचे समाधीवर पुष्पवृष्टी केली. श्री पांडुरंगराय, श्री संत माऊली, श्री संत तुकाराम महाराज यांची आरती झाली.