शुभमन गिलची गंभीरसाठी बॅटिंग

टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने ओव्हल मैदानावरील मुख्य क्युरेटर ली फोर्टिससोबत झालेल्या वादानंतर हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पाठराखण केली. गिलने म्हटले की, कोचला पिच तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. हिंदुस्थानी संघाच्या मंगळवारच्या सराव सत्रादरम्यान क्युरेटर फोर्टिससने टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफला मुख्य पिचपासून दीड ते दोन मीटर दूर राहण्यास सांगितले. गंभीरने जॉगर्स आणि रबर स्पाईक असलेले बूट घातलेले असताना क्युरेटरचे असे बोलणे चुकीचे होते. त्यामुळेच गौतम गंभीर क्युरेटरवर भडकले. ‘तुला आम्ही काय करायचे हे सांगण्याची गरज नाही. तुला याचा अधिकार नाही. तू एक फक्त ग्राऊंड स्टाफ आहेस, काही विशेष नाहीस,’ अशा शब्दांत गंभीर यांनी क्यूरेटरला फटकारले.

आज पत्रकार परिषदेत बोलताना शुभमन गिल म्हणाला, ‘संघांच्या प्रशिक्षकांना खेळपट्टी पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र क्युरेटर परवानगी नाकारणारे कोण? जर कोणी स्पाईक्स बूट घालून किंवा अनवाणी पायाने फिरत असेल तर खेळपट्टीवर येण्यास काहीच अडचण नसते. फोर्टिसने का रोखले, हेच समजले नाही.