
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफबाबतच्या धमकीने जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या या धमकीमुळे जगभरातील अनेक शेअर बाजाराची दाणादाण उडाली आहे. हिंदुस्थानी शेअर बाजारातही सोमवारी मोठी घसरण झाली आहे. मात्र, जगभरातील चिंतेचे वातावरण सोन्या-चांदीसाठी पोषक ठरत आहे. अनेक तज्ज्ञांनी चांदी लवकरच तीन लाखांचा टप्पा पार करेल, असा अंदाज वर्तवला होता. आता चांदीने ३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर सोन्याचीही दीड लाखांकडे वाटचाल सुरू आहे.
चांदीच्या किमतींनी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी वायदे बाजारातील फ्युचर्स ट्रेडिंगचे सर्व विक्रम मोडले. चांदीने सोमवारी प्रतिकिलोसाठी ३ लाख रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. जागतिक तणाव वाढत असताना या वर्षी आतापर्यंत चांदीच्या किमतीत 65,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ट्रम्प यांनी टॅरिफबाबत दिलेल्या धमकीचा परिणाम जगभरात दिसून आला आहे. सोमवारी वायदे बाजारात चांदीच्या किमतीत तब्बल १३ हजरांची वाढ झाली आणि चांदीने ३ लाखांचा टप्पा पार केला आहे.
सोमवारी वायदे बाजाराचे (मल्टी कमोडिटी एक्सचेंज, MCX) व्यवहार सुरू होताच चांदीच्या किमती १३,५५३ रुपयांनी वाढल्या आणि त्यांनी ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. १ किलो चांदीचा नवा सर्वकालीन उच्चांक ३,०१,३१५ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, शुक्रवारी, MCX चांदीचा दर २,८७,७६२ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. २०२५ प्रमाणेच या वर्षाच्या सुरुवातीलाच चांदीच्या किमती वाढत आहेत. या वर्षात चांदीचा भाव आतापर्यंत प्रति किलो ६५,६१४ रुपयांनी वाढला आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी १ किलो चांदीची किंमत २,३५,७०१ होती. ती आता प्रति किलो ३०१,३१५ वर पोहोचली आहे.
चांदीप्रमाणेच सोन्याच्या किमतीतही झपाट्याने वाढ होत नवीन उच्चांक गाठला आहे. वायदे बाजारात सोन्याचा दरही चांदीप्रमाणेच वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात फेब्रुवारीसाठी सोन्याचा वायदा भाव प्रति १० ग्रॅम १,४२,५१७ वर बंद झाला आणि सोमवारच्या सुरुवातीपर्यंत तो १,४५,५०० या नवीन उच्चांकावर पोहोचला होता. सोमवारी बाजाराची सुरुवात होताच २४ कॅरेट सोन्याच्या दर २,९८३ रुपयांनी वाढला आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत १,३५,८०४ होती, म्हणजेच ती प्रति १० ग्रॅम ९,६९६ ने वाढली आहे.




























































