
कोकणच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेला आंबा व्यवसाय यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. जगाच्या नकाशावर आपल्या चवीसाठी प्रसिद्ध असलेला देवगडचा हापूस यंदा हवामान बदलाच्या कात्रीत अडकला असून, बागांमध्ये फळधारणा अत्यंत कमी झाल्याने सर्वसामान्य शेतकरी आणि बागायतदारांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
कोकणातील शेतकऱ्यांसाठी आंबा हे केवळ पीक नसून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून असतो. यंदाचा हंगाम सुरू झाल्यापासून बागायतदारांनी खते, कीटकनाशकांची फवारणी, बागांची साफसफाई आणि कुंपण यांसाठी अहोरात्र मेहनत घेतली. मात्र, निसर्गाने साथ न दिल्याने मेहनतीचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा मेळ बसवणे आता कठीण झाले आहे. नोव्हेंबर अखेरीस पडलेल्या थंडीमुळे बागांमध्ये मोहर येण्यास सुरुवात झाली होती, परंतु हा मोहर प्रामुख्याने ‘पालवी मोहर’ स्वरूपाचा असल्याने तो अपेक्षेप्रमाणे फळधारणेसाठी पोषक ठरला नाही.
डिसेंबर महिन्याच्या मध्यात तापमानात झालेल्या कमालीच्या बदलाने परिस्थिती अधिक गंभीर केली. किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे मोहरामध्ये नर फुलांचे प्रमाण वाढले. परिणामी, योग्य परागीभवन न झाल्याने फळधारणा झालीच नाही. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या बहरातही हीच स्थिती कायम राहिली. सध्या बागांमध्ये केवळ वाळलेला मोहर दिसून येत असून, झाडांवर फळांचे प्रमाण नगण्य आहे. या संकटामुळे आर्थिक गणिते कोलमडल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

























































