दोषींवर कारवाई करा अन्यथा…; आमदार वैभव नाईक यांनी केली मागणी

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले होते. मात्र अवघ्या आठ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा पूर्णत: कोसळला आहे. या घटनेवरून कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वैभव नाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भग्न पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून शिवप्रेमींनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तसेच वैभव नाईक यांनी देखील सरकारच्या निकृष्ठ दर्जाच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज निकृष्ठ कामामुळे कोसळला. याबद्दल आम्हाला फार दु:ख होत आहे. शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. गेल्या सहा महिन्यांपूर्वा कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला. त्यावेळी इथल्या स्थानिकांनी पुतळ्याच्या कामाविषयी तक्रारी केल्या होत्या. परंतु याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं. मागील 400 वर्षांपूर्वीच्या गड किल्ल्यांचे बांधकाम पाहिले असेल तर एकही दगड किंवा चिरा ढासळली नाही. परंतु सहा महिन्यातच हा पुतळा कोसळला आहे. असे वैभव नाईक यावेळी म्हणाले.

‘पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काय तरी वेगळ केलं पाहिजे म्हणून हा पुतळा उभारण्यात आला. पंरतु त्यावेळीच्या निकृष्ठ बांधकामामुळे ही घटना घडली आहे. आता सरकार आपली भूमिका दुसऱ्यावर ढकलतील. त्यामुळे दोषींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तीव्र आंदोलन करू. तसेच या बेकादा कामाचा आम्ही निषेद करतो. मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना मी विनंती करतो की, अगदी शांतते हा विषय हाताळायचा आहे. शिवप्रेमींनी कोणताही उद्रेक करू नये. तसेच या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे का याच्या चौकशीसाठी सरकारने वेगळी समिती नेमली पाहिजे. नाहीतर आम्ही शिवप्रेमी म्हणून तीव्र आंदोलन करू असा इशारा वैभव यांनी सरकारला दिला आहे.