
कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटल येथे कस्तुरी पाताडे हिच्या मानेच्या वरील भागात असलेली गाठीची शस्त्रक्रिया झाली होती. कस्तुरी हिची प्रकृती, कोल्हापूर येथील रुग्णालयात झालेला मृत्यू व त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी नागवेकर हॉस्पिटलची केलेली तोडफोड याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी व त्यानुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डॉ. अनंत नागवेकर यांच्या फिर्यादीनुसार 50 ते 60 जणांच्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, मृत कस्तुरीचे वडील चंद्रकांत आकाराम पाताडे यांच्या फिर्यादीनुसार डॉ. अनंत नागवेकर व त्यांचा मुलगा डॉ. मयूर नागवेकर अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत पाताडे यांच्या फिर्यादीनुसार, कस्तुरीच्या मानेच्या वरील भागास गाठ आली होती. त्यासाठी कस्तुरीला घेऊन नागवेकर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी 5.30 वा. सुमारास तिच्यावर गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतर कस्तुरीची तब्येत खालावत गेली. डॉ. नागवेकर यांच्या सल्ल्यानुसार पाताडे कुटुंबीयांनी कस्तुरी हिला कोल्हापूर येथे रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचार सुरू असताना कस्तुरी हिचा मृत्यू झाला. डॉ. अनंत नागवेकर, डॉ. मयूर नागवेकर यांनी गाठीची परिपूर्ण तपासणी न करता, कोणतीही काळजी न घेता शस्त्रक्रिया केली. माझ्या मुलीची काळजी न घेता मुलीचा मृत्यू होवू शकतो . याची जाणीव असताना शस्त्रक्रिया केली , त्यामुळे कस्तुरीचा मृत्यू झाला असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार डॉ. अनंत नागवेकर व त्यांचा मुलगा डॉ. मयूर नागवेकर यांच्या विरुध्द भारतीय दंड न्यायसंहिता 105 ( इ ) (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. अनंत नागवेकर यांच्या फिर्यादीनुसार, आपल्या कणकवली येथील रुग्णालयात 14 डिसेंबर रोजी दु. 12.10 वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह घेवून येत दरवाजावर ठेवला. डॉक्टरांना बोलवा अशी आरडाओरड करुन 50 ते 60 जणांचा जमाव गोळा झाला. जमावाने रुग्णालयात घुसून आरडाओरड करतानाच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व हाताच्या थापटाने मारहाण केली. त्यावेळी तेथे दाखल डॉ. नागवेकर यांची पत्नी व सून यांनाही जमावाने हाताच्या थापटाने मारहाण केली. तसेच रुग्णालयातील बेंचेस, काचा, फॅन, वायर, लाईट आदींची तोडफोड करत 15 लाखांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील 15 ते 16 जणांची नावे निश्चित असल्याचे समजते. या आरोपींविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय संस्था अधिनियम 2010 कलम 4 चे 189(2) , 189(3) , 189 (5) , भा.द.न्या. 324 (5 ) , 118(1) , 111 ( 2) , 351 /2 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये बेकायदेशीर जमाव करुन मालमत्तेचे नुकसान करणे, डॉक्टर, नर्स, कर्मच्यांना धमकी देणे याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांकडून या संशयित आरोपींची नावे देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत पोलिसांचा चोख बंदोबस्त असून रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पोलीस गुन्हा घडलेल्या ठिकाणी पंचनामा करण्याची शक्यता असून आवश्यकतेनुसार कारवाई करणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.


























































