सिंगापूरने पाच चेंडूंत जिंकला सामना, टी-20 क्रिकेटमध्ये आणखी एका नकोशा विक्रमाची भर

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो हे आपल्याला वेळोवेळी बघायला मिळाले आहे. कधी एका षटकात सहा षटकार, तर कधी एका डावात तीनशे धावा असा टी-20 क्रिकेटचा थरार आपण बघत आलोय. आता यात आणखी एक नकोशा विक्रमाची भर पडलीय. सिंगापूरने मंगोलियाविरुद्धचा टी-20 सामना अवघ्या 5 चेंडूंत जिंकण्याचा पराक्रम केलाय.

सर्वाधिक चेंडू राखून दुसऱ्या क्रमांकाचा विजय

सिंगापूरने मंगोलियावर 115 चेंडू राखून विजय मिळवित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू राखून दुसऱया क्रमांकाचा विजय मिळविला. याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये स्पेनने इल्स ऑफ मॅन संघाचा 118 चेंडू राखत विजय मिळविला होता. या लढतीत तर स्पेनने दुसऱयाच चेंडूवर विजय संपादन केला होता.

भारद्वाजने 3 धावांत टिपले 6 विकेट

मंगोलिया आणि सिंगापूर यांच्यात आशियाई पात्रता ‘अ’ स्पर्धेत टी-20 सामना खेळविण्यात आला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना मंगोलियाचा संपूर्ण संघ 10 षटकांत केवळ 10 धावांवर बाद झाला. त्यांच्या पाच फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. चार फलंदाजांनी प्रत्येकी एक धाव केली, दोन फलंदाजांनी 2-2 धावा केल्या, तर 2 अवांतर धावा मिळाल्या. सिंगापूरकडून हर्षा भारद्वाजने 3 धावांच्या मोबदल्यात 6 बळी टिपले. प्रत्युत्तरादाखल सिंगापूरने 5 चेंडूंत 1 बाद 13 धावा करीत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.