
युद्धामुळे अवघे जग गॅसवर असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बेताल व असंवेदनशील बडबड सुरूच आहे. ‘इराणी जहाज बुडवताना मला खूप आनंद होतो,’ असे जाहीर सांगत ट्रम्प यांनी राक्षसी आनंद व्यक्त केला. होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास इराणवर आणखी 20 पट हल्ले चढवू, अशी धमकीही त्यांनी दिली.
अमेरिकी नौदलाने आतापर्यंत इराणी नौदलाच्या 46 मोठ्या युद्धनौका बुडवल्या आहेत. त्या सगळय़ा आता समुद्राच्या तळाशी पडून आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला. ‘इतकी जहाजे बुडवल्यामुळे मला आपल्या अधिकाऱयांचा राग आला होता. जहाजे बुडवण्याऐवजी ताब्यात का घेतली नाहीत, आपल्याला वापरता आली असती, असं मी त्यांना म्हणालो. पण जहाजे बुडवताना खूप आनंद होतो. ती मजाच वेगळी असते. शिवाय, तसं करणं जास्त सुरक्षित असतं असं त्यांनी मला सांगितलं. मलाही ते पटलं आहे. इराणी जहाज बुडवताना मलाही आनंद होतो,’ असे ट्रम्प म्हणाले.
होर्मुझच्या सामुद्रधुनीत रहस्यमय हालचाली
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझजी सामुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी बंद केली असताना तिथे रहस्यमय हालचाली वाढल्या आहेत. या जलमार्गावर अचानक मोठय़ा संख्येने जहाजे दिसू लागली आहेत. यातील बहुतेक जहाजे गटागटाने आणि वेगाने प्रवास करत आहेत. इलेक्ट्रॉनिक जॅमिंगमुळे होर्मुझमध्ये हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.































































