SIR प्रक्रिया म्हणजे मत चोरण्याचा नवीन मार्ग, राहुल गांधी यांचा आरोप

मतदार फेरतपासणी (SIR) हा मत चोरीचा नवा मार्ग आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय की ज्या मतदारांनी मागील लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते, पण आता बिहारमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान त्यांच्या नावांची मतदार यादीतून नावं वगळली गेली अशा लोकांना मी भेटलो आहे.

एक फोटो शेअर करत राहुल गांधींनी पोस्टमध्ये लिहिले की, SIR हे मत चोरीचे नवे शस्त्र तयार झाले आहे. या फोटोमध्येत्यांच्यासोबत उभे असलेले लोक ही या मतं चोरीचे जिवंत पुरावे आहेत. या सर्वांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते, परंतु जसजसे बिहार विधानसभा निवडणूक आली, तसतसे निवडणूक यादीतून त्यांची ओळख आणि अस्तित्व गायब केले गेले असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, तुम्हाला माहिती आहे का हे लोक कोण आहेत? राज मोहन सिंह (70), शेतकरी आणि निवृत्त सैनिक, उमरावती देवी (35), दलित आणि मजूर, धनंजय कुमार बिंद (30), मागासवर्गीय आणि मजूर, सीता देवी (45), महिला आणि माजी मनरेगा मजूर, राजू देवी (55), मागासवर्गीय आणि मजूर, मोहम्मदुद्दीन अन्सारी (52), अल्पसंख्याक आणि मजूर.

 

भाजप आणि निवडणूक आयोग यांच्या संगनमताने त्यांना केवळ यासाठी शिक्षा दिली जात आहे कारण ते बहुजन आणि गरीब घटकांमधून आले आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की त्यांच्याकडे ना मत राहिले आहे, ना ओळख आणि ना हक्क. इतकेच नव्हे तर आपल्या जवानांनाही या अन्यायापासून वाचवले गेलेले नाही. एक व्यक्ती, एक मत हा सर्वात मूलभूत हक्क सुरक्षित राहील यासाठी आम्ही या लोकांसोबत आहोत, हा फक्त हक्कांचा प्रश्न नाही तर लोकशाहीतील सर्वांच्या समान सहभागाचा मुद्दाही आहे असेही राहुल गांधी म्हणाले.