मोहम्मद सिराज व उमरान मलिक या वेगवान गोलंदाजांना आजारपण व दुखापतीमुळे ‘दुलीप ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. याचबरोबर अष्टपैलू रवींद्र जाडेजानेही या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मात्र, त्याच्या माघारीचे कारण अद्यापि स्पष्ट झालेले नाही.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी ‘टीम इंडिया’तील खेळाडूंना सरावासाठी ‘दुलीप ट्रॉफी’ ही एक प्रकारची रंगीत तालीमच असणार आहे. या स्थानिक स्पर्धेचा थरार 5 सप्टेंबरपासून रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने खेळाडूंबद्दल माहिती दिली. ‘ब’ संघात समाविष्ट असलेला अष्टपैलू खेळ्डू रवींद्र जाडेजा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत सहभागी होणार नाहीत. या दोघांशिवाय ‘क’ संघाचा गोलंदाज उमरान मलिकही बाहेर आहे. सिराजच्या जागी नवदीप सैनी आणि उमरान मलिकच्या जागी गौरव यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.
रवींद्र जाडेजाला संघातून मुक्त करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीमाध्यमांना दिली आहे, मात्र जाडेजाला का सुट्टी दिली, यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. दुलीप ट्रॉफीमध्ये जाडेजाचा ‘ब’ संघात समावेश करण्यात आला होता. अभिमन्यू ईश्वरन या संघाचा कर्णधार आहे. या संघात मोहम्मद सिराजचाही समावेश होता, मात्र सिराज आजारपणामुळे बाहेर गेला आहे. रवींद्र जाडेजा बऱ्याच दिवसांपासून ब्रेकवर आहे आणि तो टीम इंडियाकडून शेवटचा सामना टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली.