
एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि सात महिलांचा विनयभंग करणाऱ्या आयटी कंपनीतील ‘त्या’ टोळीकडून तरुण-तरुणींवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता, असे चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, या गुह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून एसआयटीमार्फत सखोल चौकशी सुरू आहे.
नाशिकच्या मुंबई नाका भागात बहुराष्ट्रीय आयटी कंपनी आहे. हे नोकरीचे ठिकाण नव्हे तर लैंगिक व मानसिक छळाचा अड्डा झाल्याचे तक्रारीवरून समोर आले आहे. कंपनीतील बॉस तौसिफ अत्तार याने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केला, तिच्या धर्मांतराचा प्रयत्न केला. याप्रकरणी तो अटकेत आहे. सात महिलांचा विनयभंग करणारे आसिफ अन्सारी, शफी शेख, रजा मेमन, शाहरूख कुरेशी, दानिश शेख यांनाही जेरबंद करण्यात आले आहे. त्यांना शुक्रवार, 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
प्रकरण गंभीर, सखोल चौकशी करणार – फडणवीस
नाशिकमधील आयटी कंपनीत घडलेले अत्याचार-धर्मांतराचे प्रकरण अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून 9 गुन्हे दाखल करण्यात असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

























































