दोन आठवड्यांत सहा मृतदेह सापडले, हत्या, आत्महत्यांनी वसई-विरारकर हादरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन आठवड्यांत विविध ठिकाणी सहा मृतदेह आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली असून हत्या व आत्महत्यांनी वसई-विरारकर हादरून गेले आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या वसई-विरारची ओळख आता तडीपार गुंडांचे माहेरघर अशी होऊ लागली आहे. ११ पोलीस ठाणी असूनही दिवसाढवळ्या हत्या होत असून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास पोलिसांना अपयश आले आहे.

विविध कारणांनी हत्या केल्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई-अहमदाबाद हायवेवरील सुनसान जागेचा वापर गुन्हेगार करत आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव असल्याने अंधाराचा फायदा घेत मृतदेह फेकले जात असल्याचा दाट संशय आहे. एका मागोमाग एक घडणाऱ्या घटनांमुळे वसई-विरार पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा चिरून आणि डोके दगडाने ठेचून क्रूरपणे हत्या करणारा रोशन यादव व त्याचा साथीदार भानुप्रताप यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर नालासोपाऱ्यात मित्राची हत्या करणाऱ्यालादेखील अटक केली. गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मुंबई-अहमदाबाद हायवेवर गस्त वाढवून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही संख्या अधिक करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

रविवारी संध्याकाळी विरार फाट्याजवळील कचऱ्याच्य ढिगाऱ्यातून दुर्गंधी सुटली होती. पोलिसांनी हा कचरा उपसला तेव्हा 45 ते 50 वयोगटांतील एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आला.

धनीव बागमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह एका विहिरीत सापडला. तर पेल्हार फाट्यावर एका इसमाचा शिरच्छेद करून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली.

नालासोपाऱ्यातही वर्दळीच्या भागात नाल्यामध्ये एका महिलेचा मृतदेह दिसून आला. फुलपाडा व विरार फाटा येथेही दोन अज्ञात पुरुषांचे मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

विरार पूर्वेच्या परिसरात रूपम ठाकूर या वीस वर्षीय तरुणाने ‘नेट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

काही दिवसांपूर्वी मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा गळा चिरून करण्यात आलेल्या हत्येचा विरार गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने उलगडा केला आहे.

घरातून निघालेल्या वृद्ध विजय वर्तकांचे निर्जनस्थळी शव आढळले

नालासोपाऱ्यातील वाघोली येथे राहणारे विजय वर्तक (77) हे 2 एप्रिलला कुणालाही न सांगता घराबाहेर पडले होते. वयोमानानुसार त्यांना स्मृतिदोषाचा आजार असून डोक्यालाही मार लागला आहे. वाट चुकल्यामुळे त्यांना घरचा रस्ता सापडत नव्हता. यावेळी दोन तरुणांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले व तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना नालासोपारा पोलीस ठाण्यात नेऊन घरच्याचा शोध घेण्याची विनंती केली. पण पोलिसांनी दुर्लक्ष केले. दरम्यान विजय वर्तक हे अज्ञात ठिकाणी निघून गेले. सोशल मीडियावर एक वृद्ध व्यक्ती मिळाल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांचा मुलगा मेहुल हा नालासोपारा पोलीस ठाण्यात गेला. दोन दिवस शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर वसई लोहमार्ग पोलिसांना शनिवारी रात्री उशिरा विरार येथे निर्जनस्थळी वर्तक यांचा मृतदेह आढळून आला. मधुमेह, उष्माघात व उपासमारीने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी केवळ नालासोपारा पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे त्यांचा नाहक बळी गेल्याचा आरोप वर्तक कुटुंबाने केला आहे.