>> मंगेश वरवडेकर
टी-20 क्रिकेट म्हणजे षटकार-चौकारांची आतषबाजी, शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखायला लावणारा थरार, विजयासाठी दोन संघांमध्ये सुरू असलेला संघर्ष… पण अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमधून हे अजूनही गायबच आहेत. जी फटकेबाजी, थरार आणि विजयासाठी असलेला संघर्ष आयपीएलमध्ये पाहायला मिळाला, तो संघर्ष आणि ती फटकेबाजी अद्याप अमेरिका आणि पॅरेबियन बेटांवर पोहोचलीच नाहीय. कोटय़वधी क्रिकेटप्रेमी त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांची प्रतीक्षा कधी संपेल याबाबत कुणाकडेही उत्तर नाहीय.
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये जगभरातील 20 संघ खेळत आहेत आणि त्यातील निम्मे संघ दुबळे असल्यामुळे कसोटीचा दर्जा असलेले दिग्गज संघ या लिंबू-टिंबू संघावर तुटून पडतील. चौकार-षटकारांची आतषबाजी करतील असा क्रिकेटप्रेमींचा समज होता, पण तो समज गोड गैरसमज ठरतोय. गेल्या दहा सामन्यांपैकी उद्घाटनीय आणि सुपर ओव्हर सामन्याचा अपवाद वगळता तर अन्य आठ सामन्यांत ना षटकार-चौकारांचा वर्षाव पाहायला मिळाला, ना टी-20 चा थरार. आतापर्यंत नऊ सामने हे एकतर्फी झाल्यामुळे क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाली आहे. एवढेच नव्हे तर, कुणाच्याही बॅटीतून घणाघाती फलंदाजीचे अपेक्षित दर्शनही होऊ शकलेले नाही.
200 पार अजूनही दूर
वर्ल्ड कप सुरू होऊन आठवडा होत आला, पण गेल्या दहापैकी एकाही सामन्यात कोणताही संघ 200 धावांचा टप्पा गाठू शकलेला नाही. अमेरिका आणि पॅनडा यांच्यात झालेल्या सामन्यात यजमान अमेरिकेने 195 धावांचा पाठलाग करताना 197 धावा केल्या होत्या. ही धावसंख्या वगळता एकही संघ 200 धावांच्या आसपासही पोहचू शकलेला नाही. याउलट दहापैकी सहा सामन्यांत संघ दीडशेचा टप्पाही गाठू शकले नाहीत. एवढेच नव्हे तर, सहापैकी तीन संघ शंभरीतच गारद झालेत. यावरून यंदाची स्पर्धा कमी धावसंख्येची तर ठरणार नाही ना, अशी भीती निर्माण झालीय.
षटकारांचा ओघ मंदावलाय
वर्ल्ड कप सुरू होताच अमेरिका आणि पॅनडा यांच्यातील लढतीत उभय संघांकडून 21 षटकार आणि 30 चौकारांची आतषबाजी झाली. ही फटकेबाजी पाहून वाटले की, अमेरिका-विंडीजमध्ये षटकारबाजी पाहायला मिळेल. पण दुसऱया सामन्यापासून क्रिकेट चाहत्यांची सुरू झालेली घोर निराशा अद्याप काही संपलेली नाही. आतापर्यंत दहा सामन्यांत केवळ 75 षटकार लगावले गेलेत. त्यापैकी 21 हे पहिल्याच सामन्यात ठोकले गेले होते. म्हणजे पुढील नऊ सामन्यांत 54 षटकार लागलेत. म्हणजेच प्रति सामना 6 आणि एका डावात केवळ 3 षटकार. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात चार अर्धशतके झळकवली गेली होती, तर उर्वरित नऊ सामन्यांत 7 अर्धशतके. याचाच अर्थ, फलंदाजांच्या बॅटीतून ना धावा निघत आहेत ना चौकार-षटकार. ना चाहत्यांना थरारक सामने पाहायला मिळताहेत. वर्ल्ड कपचा हा एकतर्फी प्रवास असाच सुरू राहिला तर स्पर्धेच्या आयोजनाबाबत तसेच खेळपट्टीबाबत प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही.