म्हाडा मुख्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या नॅशनल लायब्ररीचा स्लॅब कोसळल्याची घटना आज घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही. या प्रकारामुळे लायब्ररीमधील कर्मचारी आणि तिथे नियमित येणाऱया सदस्यांची सुरक्षा वाऱयावर असल्याचे दिसतेय. अलीकडेच म्हाडाने मुंबईतील 20 अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर केली होती. मात्र म्हाडाच्या मुख्यालयाची इमारतच किती सुरक्षित आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयाच्या तळमजल्यावरील गाळे प्राधिकरणाने भाडेतत्त्वावर दिली आहेत. त्यातील गाळा क्रमांक 52 मध्ये गेल्या 48 वर्षांपासून नॅशनल लायब्ररीची शाखा कार्यरत आहे. या शाखेत सुमारे 300 सभासद असून त्यातील बहुतेक सभासद म्हाडाचे कर्मचारी आहेत. लायब्ररीच्या वतीने सकाळी म्हाडाकडे तक्रार करण्यात आली होती आणि दुपारीच स्लॅब कोसळण्याची घटना घडली, असे लायब्ररीचे प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत प्रकल्प नियोजन विभागाच्या अधिकाऱयांकडे विचारणा केली असता अभियंत्यांनी लायब्ररीची पाहणी केली असून लवकरच यासंदर्भात योग्य कार्यवाही करू, असे ते म्हणाले.