
स्मार्टवॉचमुळे तरुणाचा जीव वाचल्याची घटना नुकतीच समोर आलीय. मुंबईतील 26 वर्षीय टेक इंजिनीअर क्षितिज झोडपे याने याबद्दलचा आपला अनुभव शेअर केला. क्षितिज एका ई-कॉमर्स कंपनीत काम करतो. त्याला स्कुबा डायव्हिंगची आवड आहे. तो पुद्दुचेरीच्या समुद्रकिनारी स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी गेला होता. 36 मीटर खोल पाण्यात स्कुबा डायव्हिंग करताना त्याचा सेफ्टी बेल्ट तुटला.
त्यामुळे तो वेगाने पाण्याच्या वर खेचला जाऊ लागला. पाण्याचा दबावही वाढू लागला होता. त्याचा जीव धोक्यात होता. पाणी अस्वच्छ असल्यामुळे दृश्यमानताही कमी होती. त्याला फक्त 5 ते 10 मीटरपर्यंतचे दिसत होते. अशा वेळी क्षितिजच्या ऍपल वॉच अल्ट्राला मात्र धोक्याची जाणीव झाली आणि वॉचने धोक्याचा सायरन वाजवला. या आवाजाने क्षितिजच्या प्रशिक्षकाचे लक्ष वेधले. प्रशिक्षकांनी तत्काळ क्षितिजची मदत करून त्याला सुरक्षित वर आणले.