
सत्तरच्या दशकातील हौशी रंगभूमीवरील कलावंत आणि आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर कोंकणी भाषेतील कार्यक्रमाच्या सादरकर्त्या पूर्वाश्रमीच्या किशोरी नार्वेकर उपाख्य स्मिता हासे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 79 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार नितीन हासे यांच्या त्या मातोश्री होत.
गोवा येथील नार्वे गावात जन्मलेल्या किशोरी नार्वेकर या उत्तम अभिनेत्री होत्या. विवाहापश्चात त्या स्मिता हासे झाल्या. त्यांनी असंख्य संगीत नाटकांमधून कामे केली होती. 70 च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनयाने हौशी व नाटय़ रंगभूमीवर आपला ठसा उमटवला होता. पंडित जितेंद्र अभिषेकींसारख्या दिग्गज गायकांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. स्मिता हासे यांनी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर कोंकणी भाषेत सादर केलेले अनेक कार्यक्रम रसिकांच्या पसंतीस उतरले होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातील कोपरी वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.



























































