
बिहारमधील एक अजब प्रकरण समोर आले आहे. बिहारमधील एका व्यक्तीने साप चावल्यानंतर जे केले ते वाचून तुम्हीही चकीत व्हाल. जंगलात काम करत असताना संतोष लोहार या व्यक्तीला साप चावला. मात्र साप चावल्यानंतर आरडाओरड करण्याऐवजी या व्यक्तीने तात्काळ त्या सापाला पकडले त्याला दोन चावले. संतोषच्या चाव्यानंतर साप मेला. संतोष सुखरूप आहे.
संतोष लोहार हा रेल्वे कर्मचारी आहे. बिहारमधील राजौलीच्या जंगल परिसरात मंगळवारी रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू होते. दिवसभर काम करून रात्री झोपायला जात असतानाच सापाने त्यांना दंश केला. यानंतर क्षणाचाही वेळ न दवडता लोहार यांनी सापाला पकडले आणि चावा घेतला.
साप माणसाला चावल्यानंतर त्या व्यक्तीने सापाला उलट चावा घेतल्याने माणसाच्या शरीरातील विष सापाच्या शरीरात जाते, असे सांगितले जाते. याचाच प्रत्यय बिहारमधील घटनेवरून आला. संतोषने सापाला चावा घेतल्यानंतर साप मेला.
संतोषच्या एका सहकाऱ्याने सापाने दंश केलेले पाहून त्याला तात्काळ राजौलीच्या सरकारी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी संतोषला तपासून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.