म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी अर्जदारांची अक्षरशः झुंबड उडते. यंदा मात्र काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळतेय. अर्ज नोंदणी आणि स्वीकृतीला कमी दिवस असतानाही आठवडाभरात केवळ 5403 अर्ज प्राप्त झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आधीच म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किमती त्यातच अॅपमधून अर्ज सादर करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी हे यामागचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे.
म्हाडातर्फे गोरेगाव पश्चिम, अॅण्टॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर, मालाड, दादर, लोअर परळसह विविध भागांतील 2030 घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि स्वीकृतीला गेल्या शुक्रवारपासून सुरुवात झाली. इच्छुकांना अर्ज सादर करण्यासाठी जेमतेम 25 ते 26 दिवस मिळाल्याने पहिल्या दिवसापासूनच अर्जदारांची झुंबड उडेल, अशी काहीशी आशा होती. प्रत्यक्षात आठवडा उलटूनही अर्जदारांचा लॉटरीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आठवडाभरात केवळ 5403 जणांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 3243 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. गेल्या वर्षी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांसाठी सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते.
अर्जदारांच्या शंकांचे निरासन होणार
म्हाडा लॉटरीशी संबंधित अर्जदारांच्या शंकांचे निरासन व्हावे याकरिता म्हाडाने 19 ऑगस्टला दुपारी 12 वाजता लाइव्ह वेबिनारचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी https://youtube.com/live/asSycqY6Dvc?feature=share या लिंकवर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावरही लाइव्ह वेबिनारची लिंक उपलब्ध आहे. म्हाडाचे यू-ट्यूब चॅनल व फेसबुक पेज @mhadaofficial वरही या वेबिनारचे थेट प्रक्षेपण केले जाईल. वेबिनारमध्ये मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी (पणन) राजेंद्र गायकवाड, म्हाडाच्या मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी संदीप बोदेले मार्गदर्शन करतील.