
अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील न्यायालयाने सोशल मीडिया कंपनी Meta प्लॅटफाॅर्म विरुद्ध एक मोठा निर्णय दिलेला आहे. दिलेल्या निर्णयांतर्गत, मुलांच्या मानसिक आरोग्याला आणि सुरक्षेला धोका पोहोचवल्याबद्दल कंपनीला सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिको येथील न्यायालयातील न्यायाधीशांनी दिलेल्या निकालात Meta ने आपल्या प्लॅटफॉर्मद्वारे, विशेषतः फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या वापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परीणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
Meta कंपनीला मुलांवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांची माहिती असूनही योग्य ती पावले उचलली गेली नाहीत, असेही न्यायालयाने या निकालामार्फत स्पष्ट केले. Meta ने केवळ नफ्याला सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याचे, यावेळी वकिलांनी सांगितले. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, प्लॅटफॉर्मवरील अल्गोरिदममुळे हानिकारक आणि संवेदनशील सामग्री मुलांपर्यंत पोहोचत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
सुमारे सात आठवडे चाललेल्या या खटल्यात अनेक पुरावे सादर करण्यात आले. त्यामध्ये कंपनीकडे मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती असल्याचे समोर आले. दरम्यान, Meta ने न्यायालयाच्या या निर्णयाशी असहमती दर्शवली असून, या निकालाविरोधात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. तज्ञांच्या मते, हा निर्णय तंत्रज्ञान कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करणारा महत्त्वाचा टप्पा असून, भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांवर याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.




























































