भिवंडीतील आदिवासी पाड्यावर मातीमाफियांचा सुळसुळाट; वीटभट्टी मालकांचा गोरखधंदा शेकडो ब्रासचे उत्खनन

भिवंडी तालुक्यातील टेपाचा पाडा या आदिवासी पाड्यावर मातीमाफियांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट सुरू आहे. वीटभट्टी मालकांचा गोरखधंदा असून शेकडो ब्रास मातीचे उत्खनन करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूलदेखील बुडाला आहे. या माती उत्खननामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून सर्वत्र माती खोदून ठेवल्याने स्मशानभूमीकडे व विहिरीच्या दिशेने जाणारा रस्ताही उद्ध्वस्त झाला आहे. लवकरात लवकर मातीमाफिया बनलेल्या वीटभट्टी मालकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

भिवंडी तालुक्यातील कुहे गावांतर्गत टेकाचा पाडा ही आदिवासी वस्ती आहे. येथील लोकसंख्या जेमतेम ३५० एवढी आहे. सर्व्हे क्रमांक १५६/२ ही सावकाराच्या नावावरील शेतजमीन असून वीटभट्टी व्यावसायिकांनी दादागिरीने मातीचे उत्खनन केल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात रवींद्र सापटा यांनी भिवंडी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या, पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. स्मशानभूमी परिसरातच खोदकाम केल्याने पूर्वी अंत्यसंस्कार केलेले काही मृतदेहदेखील बाहेर पडल्याचे सांगण्यात येते.

आदिवासी पट्ट्यातील बेकायदा माती उत्खननाबाबत कुहे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किसन ठोंबरे यांनीदेखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. टेपाचा पाडा येथे शेतीवर जाण्यासाठी पावसाळ्यात जायला रस्ताही राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात कोणतीही परवानगी न घेता मातीचे उत्खनन केल्यामुळे रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे.

कारवाई करणार
माती उत्खनन केल्याच्या तक्रारी आल्यानंतर आपण प्रत्यक्ष जागेवर भेट दिली असून त्यात तथ्य आढळून आले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार जमिनीचा पंचनामा करून माती उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल अशी माहिती तलाठी किशोर हंबीर यांनी दिली.