सोलापूर जिल्हा विमान वाहतुकीने जोडल्यामुळे येथील उद्योग व्यवसायाला मोठय़ा प्रमाणावर चालना मिळणार आहे. तसेच देश-विदेशातील विठ्ठलभक्तांना दर्शनासाठी हवाई सुविधा मिळणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
होटगी रोडवरील नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे आज उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. याचबरोबर त्यांच्या हस्ते शिवाजीनगर न्यायालय ते स्कारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन, स्कारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचे भूमिपूजन, क्रांतिज्योती साकित्रीबाई फुले स्मारकाचे भूमिपूजन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर किमानतळाचे उद्घाटन झाले.
सोलापूर विमानतळावर आयोजित कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शीतल तेली-उगले, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, सोलापूर हे थेट एअर कनेक्टिव्हिटीशी जोडले गेले आहे. विमानतळाची सर्व प्रकारची क्षमता वाढविली असून, व्यापार, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसेच देश-विदेशातून येणाऱया विठ्ठलभक्तांना विठ्ठलाचा आशीर्वाद हा एकप्रकारे उपहार मिळाला आहे. विमानतळ संचालक सी. एम. वंजारा यांनी प्रास्ताविक, तर विमानतळ व्यवस्थापक चंपला बा यांनी आभार मानले.