भाजपा कार्यालयासमोर भोपळा फोडून फडणवीस यांचा निषेध; सोलापुरात काँग्रेसचे आंदोलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने भाजप कार्यालयासमोर भोपळा फोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शहर व जिल्हय़ात झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती आणि मदतनिधीसह शेतकऱ्यांना दिलेल्या फसव्या मदतीबाबत राज्य शासनावर टीका केली होती. या टिकेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानसेवा उद्घाटन कार्यक्रमात खासदार शिंदे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. या टिकेचे पडसाद काँग्रेससह सर्वत्र उमटत आहेत.

युवक काँग्रेसच्या वतीने भाजप शहर कार्यालयासमोर घोषणाबाजी करत फडणवीसांचे चित्र लावलेला भोपळा फोडून निषेध करण्यात आला. युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी नगरसेवक विनोद भोसले, तिरुपती परकीपेडला, महेश लोंढे, विवेक कन्ना, संजय गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनावेळी भोपळ्याबरोबर टरबूज, मिरच्या आणल्याने वातावरण गंभीर बनले होते.