नागरिकांच्या समस्या व निवेदन घेण्यास वेळ नसलेल्या महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या गाडीवर गटारीचे पाणी टाकून नागरिकांनी निषेध केला आहे. ही धक्कादायक घटना महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोरच घडली आहे.
शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमध्ये गेल्या चार महिन्यांपासून नळाला दूषित पाणी येत आहे. पावसाळ्यात या वस्तीत व घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी घुसत असल्याच्या वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या; परंतु पालिका प्रशासन नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष देत नव्हते. आज दुपारी पालिका आयुक्त बैठकीच्या निमित्ताने कक्षात बसलेल्या असताना मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरातील काही महिला व तरुण निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र, बैठक सुरू असल्याने निवेदन घेण्यास कोणीही बाहेर आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी पालिका आयुक्तांच्या गाडीवर गटारीचे घाण पाणी टाकून घोषणाबाजी करीत निषेध केला. या घटनेने पालिकेच्या आवारात खळबळ उडाली. बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी आंदोलन करणाऱया अजय ऊर्फ रावण मैंदर्गीकर व त्याच्या सहकाऱयांना ताब्यात घेतले आहे.