सोलापूर पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, 3 प्रवाशांची प्रकृती गंभीर

सोलापूर पुणे महामार्गावरील आडेगाव ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. गुरुवारी पहाटे सोलापूर ते पुणे जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असून 3 ते 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

साई गणेश ट्रॅव्हल्स ची MH 48 K 1981 ही ट्रॅव्हल्स अहमदपूर (जिल्हा लातूर) ते पुणे अशी जात असताना पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच रात्रगस्तचे अधिकारी psi धापटे, हायवे पेट्रोलिंग चे अंमलदार Hc 862 पवार व pc 2145 इंगोले, अपघात पथकाचे Hc 1719 सरडे, पोलीस मित्र Hc 1886 कदम घटनास्थळी पोहोचले. यानंतर ट्रॅव्हल्स मधील सर्व प्रवासी यांना बाहेर काढण्यात आले.

दरम्यान अपघातात जखमी झालेल्यां प्रवाशांना टेंभुर्णी येथील मार्स हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 प्रवासी होते. त्यापैकी 3 प्रवासी गंभीर जखमी असून 17 ते 18 किरकोळ जखमी आहेत. अपघात होताच ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळावरून पळून गेल्याचे समजले. त्यामुळे सध्या पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.