
चारकोप विभागातील बेकायदेशीर पार्किंगच्या समस्या लवकरात लवकर दूर करा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिवसेना चारकोप विधानसभा शाखा क्र. 20 तर्फे विधानसभा प्रमुख संतोष राणे यांच्यासह विधानसभेतील पदाधिकाऱयांनी विभागातील पार्किंगच्या समस्यांची पाहणी केली. त्यानंतर विधानसभा प्रमुख संतोष राणे आणि शाखाप्रमुख विजय मालुसरे यांनी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटून पार्किंगच्या समस्यांबाबत चर्चा केली. शाळेच्या बसमध्ये आपत्कालीन दरवाजा नसणे तसेच क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणे, रोड-फुटपाथ तसेच मेट्रो स्टेशनखाली वाहनांची बेकायदेशीर पार्किंग करणे, फुटपाथवर गॅरेजवाल्यांनी बेकायदेशीर दुकाने थाटणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली. यावेळी विधानसभा संघटक सविता देसाई, उपविभागप्रमुख अनंत नगाम, श्याम मोरे हेदेखील उपस्थित होते.