
डोक्यात लाकडी दांडा घालून जावयाने 90 वर्षीय सासूची निघृण हत्या केल्याची घटना उरणच्या मोठेभोम परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी जावई सुरेश पाटील (49) याला अटक केली असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उरण तालुक्यातील मोठेभोम गावात हिराबाई जोशी (90) या वृद्ध महिला घरी एकट्याच राहात होत्या. महिलेच्या तिन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. जोशी यांना जमिनीचे 16 लाख रुपये मिळाले होते. काही पैशांचा वाटा मुलींमध्ये केला होता. वृद्धेचा एक जावई सुरेश पाटील यांचा त्यांच्या पैशांवर डोळा होता. या जावयाने सासूबाईंकडे पैशांची मागणी केली होती. पैसे दिले नसल्याचा राग मनात धरून जावयाने डोक्यात लाकडी दांडा घालून सासूची हत्या केली. शवविच्छेदनाच्या अहवालात वृद्धेचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी आरोपी जावयाच्या मुसक्या आवळल्या.




























































