
एकीकडे नाशिकच्या भोंदूबाबा खरातच्या दुष्कर्मामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच डोंबिवलीत एका शिक्षिकेला अश्लील मेसेज व व्हिडीओ पाठवून शारीरिक संबंधासाठी दबाव टाकणारा शाळेच्या ट्रस्टींचा मुलगा मात्र मोकाट आहे. पोलिसांनी त्या मुलाला केवळ नोटीस बजावली असून तपास सुरू असल्याचे उत्तर पोलिसांकडून वारंवार दिले जात आहे. एकीकडे महिलांच्या छळांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना पोलीस कुणाच्या दबावाखाली आरोपीला वाचवत आहेत का, असा सवाल डोंबिवलीवासीयांनी केला आहे.
सागावच्या जयभारत हायस्कूलचे ट्रस्टी शिवकुमार अय्यर यांचा मुलगा सरवना अय्यर याने शाळेतील एका शिक्षिकेला अश्लील मेसेज व व्हिडीओ पाठवला. तसेच तिच्याकडे शारीरिक संबंधाचीही मागणी केल्याचा आरोप या पीडित शिक्षिकेने केला. सरावना अय्यरच्या छळाला कंटाळून अखेर त्या शिक्षिकेने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. अय्यरवर गुन्हा दाखल झाला. मात्र त्याला अटक न करता पोलिसांनी केवळ चौकशीची नोटीस बजावली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनीही आरोपीला नोटीस बजावून पुढील तपास करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
कुंपणच शेत खातेय तर न्याय कुणाकडे मागायचा?
डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक, शैक्षणिकनगरीत शाळेच्या विश्वस्तांच्या मुलाकडूनच शिक्षिकेच्या बाबतीत असली गंभीर कृत्य केली गेली. परंतु पोलीस केवळ नोटीस बजावून तपास सुरू असल्याचे उत्तर देतात. आरोपीला अटक कधी करणार? कुंपणच शेत खात असेल तर न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने यांनी केला. योग्य ती कारवाई करा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही माने यांनी दिला.



























































