
मध्य प्रदेशमधील इंदूर येथून हनीमूनसाठी मेघालयला गेलेल्या राजा रघुवंशी याची त्याची पत्नी आणि कथित प्रियकराने ‘कॉन्ट्रॅक्ट किलर्स’च्या मदतीने निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजा रघुवंशीची पत्नी सोमन, तिचा कथित प्रियकर राज कुशवाह यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. सोनम हिने पतीच्या हत्येच्या षडयंत्रात सहभागी असल्याचीही कबुली दिली आहे. या प्रकरणात रोज चक्रावून टाकणारे नवनवीन खुलासे होत आहेत.
सोनम हिचे लग्नाचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लग्नामध्ये ती खूश दिसत नव्हती. तिच्याच वडिलांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या राज कुशवाह याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. परंतु याची चाहूल लागल्याने तिच्या कुटुंबियांनी घाईघाईने तिचे राजासोबत लग्न लावून दिले होते. याचा राग आल्याने सोनमने प्रियकराच्या मदतीने राजाचा काटा काढण्याचे ठरवले. सोनम हनीमूनच्या बहाण्याने राजा रघुवंशी याला मेघालयला घेऊन गेली. ती त्याला जवळही येऊ देत नव्हती. एवढेच नव्हे तर शरीरसंबंध ठेवण्याआधी तिने राजासमोर एक अटही घातली होती.
सोमन आणि राजा यांचे 11 मे रोजी इंदूरमध्ये लग्न झाले. लग्नानंतर सोनम चार दिवस सासरी राहिली. त्यानंतर ती माहेरी निघून गेली. यावेळी तिने राजला मेसेज करून मला पतीजवळ राहणे आवडत नाही असे सांगितले. एवढेच नाही तर राजाने जवळीक साधू नये यासाठी त्याला एक अट घातली होती. गुवाहाटीतील कामाख्या मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर शारीरिक संबंध ठेऊन वैवाहिक जीवनाची सुरुवात करेल, अशी अट सोनमने घातली होती. त्यामुळे राजाने गुवाहाटी आणि मेघालयला जाण्याचा प्लॅन केला. तर दुसरीकडे सोनमने मेघालयच्या जंगलामध्ये नेऊन राजाला मारण्याचा कट रचला, असेही पोलीस तपासात उघड झाले आहे.
राजा आणि सोनम रघुवंशी गुवाहाटीमार्गे मेघालयात पोहोचले. 23 मे रोजी दोघेही बेपत्ता झाले. 2 जून रोजी राजाचा मृतदेह एका दरीमध्ये सापडला. तर तिथून जवळपास 1200 किलोमीटर दूर उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे सोनम हिने पोलीस स्थानकात आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि अन्य तीन कॉन्ट्रॅक्ट किलरलाही बेड्या ठोकल्या. पोलीस चौकशीदरम्यान सोनमसह सर्वच आरोपींनी गुन्हा कबूल केला.
पोलीस अधिकारी विवेक सायम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कॉन्ट्रॅक्ट किलर 21 मे रोजी गुवाहाटीला पोहोचले होते. तिथे ते एका लॉजवर राहिले आणि त्यानंतर शिलाँगच्या दिशेने निघाले. शिलाँगला गेल्यावर कॉन्ट्रॅक्ट किलरने सोनम समोरच राजा रघुवंशी याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दरीत ढकलून दिला.